Koyna Dam : कोयना धरणात केवळ 30 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक
मुसळधार पावसाचे आगार, अशी ओळख असलेल्या कोयना (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात यंदा जूनच्या मध्यावर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तीव्र उन्हाळा आणि मान्सून लांबल्याने, धरणात केवळ 30 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Koyna Dam : मुसळधार पावसाचे आगार, अशी ओळख असलेल्या कोयना (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात यंदा जूनच्या मध्यावर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तीव्र उन्हाळा आणि मान्सून लांबल्याने, धरणात केवळ 30 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
राज्यातील सर्वाधिक पर्जन्यमान कोयना, नवजा आणि महाबळेश्वर या भागात नोंदवले जाते. मात्र, यंदा मौसमी पावसाने पाठ फिरवल्याने, जलव्यवस्थेवर परिणाम जाणवू लागले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जूनमधील पावसात (Koyna Dam) तब्बल 90 टक्क्यांहून अधिक घट झाली असून, धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर आला आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, कोयना कॉलनी (Koyna Dam) परिसरात गतवर्षी जूनअखेरपर्यंत 467 मिमी पाऊस झाला होता. यंदा केवळ 15 मिमी पाऊस झाला आहे. नवजा येथे 460 मिमी पाऊस झाला होता. यंदा केवळ 75 मिमी पाऊस नोंदवला आहे. महाबळेश्वरमध्ये 406 मिमी पाऊस झाला होता. यंदा केवळ 24 मिमी इतकी नोंद झाली आहे. पाऊस नसल्याने धरणात येणारा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह ठप्प झाला आहे.
धरणातील पाणीसाठ्याची स्थिती अधिकच गंभीर आहे. सध्या धरणात एकूण 14 टीएमसी पाणीसाठा असून, त्यातील उपयुक्त साठा केवळ 8.88 टीएमसी आहे. गतवर्षी याच कालावधीत उपयुक्त साठा 20 टीएमसीपेक्षा अधिक होता. धरणाची जलपातळी घसरत असल्याने मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
दरम्यान, सिंचनासाठी सुरू असलेला पाण्याचा विसर्गही कायम असल्याने उपलब्ध पाणीसाठ्यावर अतिरिक्त ताण पडत आहे. सध्या सुरू असलेल्या विसर्गामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या केवळ 30 दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे.
कोयना (Koyna Dam) पाणलोट क्षेत्र हे राज्याचे जलभांडार मानले जाते. येथे पडणार्या पावसाने केवळ धरण भरत नाही, तर राज्याच्या वीज निर्मिती आणि सिंचन व्यवस्थेचा कणा मजबूत ठेवतो. मात्र, यंदा कमी पर्जन्यमानामुळे त्यावर ताण येण्याची शक्यता आहे. विशेषतः वीज निर्मितीवर थेट परिणाम होण्याची भीती आहे.






