Pune: कोथरूडच्या ऊर्जा सवदत्तीने दक्षिण कोरियात जिंकली दोन रौप्यपदके

पुणे : कोथरूड येथील डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलमधील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी ऊर्जा सवदत्ती हिने दक्षिण कोरियामध्ये आयोजित वर्ल्ड तायक्वांदो कल्चर एक्स्पोमध्ये दोन रौप्यपदके जिंकून शहराचे आणि शाळेचे नाव उज्वल केले आहे. १ डॅन ब्लॅक बेल्ट धारिका असलेल्या ऊर्जाने आपल्या असामान्य प्रतिभेने आणि मेहनतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले.
ऊर्जाने तिचे पहिले रौप्यपदक पूमसे सादरीकरणात पटकावले. पूमसे ही तायक्वांदोतील विविध तंत्रांची सुसूत्र कोरिओग्राफ केलेली कृती आहे, जी प्रशिक्षण आणि स्पर्धांसाठी महत्त्वाची मानली जाते. दुसरे रौप्यपदक तिने फाईटिंग (लढाई) प्रकारात जिंकले, ज्यामुळे तिच्या तायक्वांदो प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. तिची शिस्त, सातत्य आणि खेळाप्रती निष्ठा यामुळे तिला हे यश प्राप्त झाले.
ऊर्जाने तिच्या यशाचे श्रेय प्रशिक्षक आणि योधी अकॅडमीचे संस्थापक राजेश पुजारी तसेच डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या मार्गदर्शनाला दिले. गेल्या काही वर्षांत तिने पुणे शहरातील विविध स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकून आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. यंदा २०२५ मध्ये तिने ब्लॅक बेल्ट डॅन २ ची परीक्षा देऊन आपल्या कौशल्यात आणखी प्रगती केली आहे.
शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि कोथरूड परिसरातील नागरिकांनी ऊर्जाच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तिच्या या यशाने केवळ शाळा आणि परिसराचा गौरव वाढवला नाही, तर तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे.





