Pune Crime : कोथरूडमध्ये पिस्टल विक्रीचा डाव उधळला; तरुणाला दोन पिस्टल, काडतुसांसह अटक
Pune Crime : पुण्यातील कोथरूडच्या केळेवाडी परिसरात पिस्टल विक्रीसाठी आलेल्या २१ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त.

Pune Crime : पिस्टल विक्रीसाठी आलेल्या २१ वर्षीय तरुणाला कोथरूड पोलिसांच्या तपास पथकाने रंगेहाथ पकडले. प्रेम देवेंद्र साळुंखे (वय २१, रा. स. नं. ३५१, म्हसोबा चौक, दत्तवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे, असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि. १९ ऑगस्ट रोजी पोलीस हवालदार शकील पठाण आणि पोलीस शिपाई शिवप्रसाद दहिफळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, केळेवाडी येथील कुमार प्रॉपर्टीजच्या मोकळ्या जागेत, पंपिंग स्टेशनपासून काही अंतरावर पांढरा शर्ट व निळी जीन्स घातलेला एक तरुण कमरेला पिस्टल लावून थांबला आहे.
मिळालेली माहिती तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांना देण्यात आली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सुधीर घुले, पोलीस हवालदार शकील पठाण, राजेंद्र लांडगे, पोलीस शिपाई ऋषीकेश कोळप, वैभव शितकाल आणि पंचांसह पथक घटनास्थळी रवाना झाले.
पोलिसांनी बातमीची खात्री करण्यासाठी दोन गुप्त बातमीदारांना संशयित तरुणाकडे पाठविले. पिस्टल विक्रीसाठी आहे का, याची खात्री केली असता त्याने आपल्याकडे पिस्टल विक्रीसाठी असल्याचे सांगितले. त्यानंतर गुप्त बातमीदाराने इशारा करताच पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले.
पंचांसमक्ष झडती घेतली असता आरोपी प्रेम साळुंखे याच्या कमरेला दोन पिस्टल आढळून आले. त्याच्या खिशांची तपासणी केली असता दोन जिवंत काडतुसे मिळाली. ही शस्त्रे विक्रीसाठी आणल्याचे आरोपीने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३३८/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण १.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधीर घुले करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, प्रभारी पोलीस उपआयुक्त परिमंडळ-३ मिलिंद मोहिते, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-३ सागर कवडे आणि सहायक पोलीस आयुक्त कोथरूड विभाग श्रीमती सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल कारोटे, तपास पथक अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर घुले, पोलीस हवालदार दत्तात्रय सोनावणे, राजेंद्र लांडगे, श्रीकांत दगडे, शकील पठाण तसेच पोलीस शिपाई शिवप्रसाद दहिफळे, मयुर पांढरे, वैभव शितकाल, गणेश डोंगरे, ऋषीकेश कोळप आणि आकाश वाल्मिकी सहभागी झाले.





