‘या’ बँकेने खातेदारांना दिला मोठा धक्का, बचत खात्यांवरील व्याजदर कपातीची घोषणा

नवी दिल्ली – खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने बचत खाते असलेल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने 5 लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बचत खात्यांवरील व्याजदर कपातीची घोषणा केली आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन व्याजदर 17 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहेत. व्याजदरातील ही कपात बँकेने सादर केलेल्या नवीन ब्रॅकेटमध्ये करण्यात आली आहे.
नवीन ब्रॅकेटची सुरुवात –
कोटक महिंद्रा बँकेने नवीन ब्रॅकेट सादर केले आहे. या ब्रॅकेट अंतर्गत, 5 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या बचत खात्यांवरील व्याजदर 50 आधार अंकांनी कमी करण्यात आला आहे. यामध्ये व्याजदर 3.5 टक्क्यांवरून 3 टक्के झाला आहे. पूर्वी बँकेच्या बचत खात्यांचे फक्त दोन स्लॅब होते. पहिल्या स्लॅबमध्ये, 50 लाखांपेक्षा कमी रकमेवर 3.5% व्याज दर लागू होते आणि 50 लाखांपेक्षा जास्त रकमेवर 4% व्याजदर लागू होते.
मात्र, आता बँकेने तीन स्लॅब तयार केले आहेत. यातील एक स्लॅब 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. त्याचा व्याज दर वार्षिक 3% आहे. त्याच वेळी, 5 लाख ते 50 लाखांपर्यंतच्या रकमेवर 3.5% व्याजदर आहे. यानंतर, 50 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर 4% व्याजदर आहे.
एफडी व्याजदरात कोणताही बदल नाही –
कोटक महिंद्रा बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. बँक सामान्य नागरिकांसाठी 2.75% ते 7.40% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.25% ते 7.90% दरम्यान व्याजदर देत आहे. हे दर 14 जून 2024 पासून लागू आहेत.





