Baramati : कोऱ्हाळे- सुपा गटाला अध्यक्षपदाची प्रतीक्षा
Baramati : यंदा कोऱ्हाळे बुद्रुक - सुपा गटातून नवनिर्वाचित संचालक सुनील भगत यांना संधी मिळणार काय, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कोऱ्हाळे- सुपा गटाला प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा सभासदांकडून व्यक्त होत आहे.

वडगाव निंबाळकर : राज्यात चर्चेत आलेल्या बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वाखालील अजितदादा पवार पॅनलने विरोधकांना चारीमुंड्या चीत केले. आता कारखान्याच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे पुणे आणि सातारा जिल्ह्यातील सभासदांचे लक्ष लागले आहे. कारखान्याच्या स्थापनेपासून ७० वर्षांच्या इतिहासात कोऱ्हाळे- सुपा गटात अध्यक्षपदाची संधी मिळाली नाही. यंदा कोऱ्हाळे बुद्रुक – सुपा गटातून नवनिर्वाचित संचालक सुनील भगत यांना संधी मिळणार काय, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कोऱ्हाळे- सुपा गटाला प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा सभासदांकडून व्यक्त होत आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या जडणघडणीत सभासद, ऊस उत्पादकांचे योगदान महत्त्वाचे आहे. कोऱ्हाळे-सुपा परिसर हा ऊस उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कारखान्याशी जोडलेले आहे. त्यामुळे कारखान्याच्या सर्वोच्च पदावर या भागाला संधी मिळावी, अशी भावना सभासदांमध्ये आहे. कारखान्याच्या स्थापनेपासून कोऱ्हाळे गटाला अध्यक्षपद मिळाले नसल्याने आता संधी चालून आली आहे.
कोऱ्हाळे- सुपा गटात प्रबळ दावेदार
कोऱ्हाळे- सुपा गटात चार टर्म संचालक आणि उपाध्यक्ष असलेले संचालक सुनील भगत यांच्या नावाची चर्चा होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विभाजनानंतरही भगत कुटुंबीय हे अजित पवार कुटुंबीयांच्या मागे ठामपणे उभे होते. सुनेत्रा पवार यांचे विश्वासू संचालक आहेत. भगत कुटुंब हे ५१ वर्षांपासून सहकार क्षेत्राशी निगडित आहे. सभासदांशी संवाद, ऊस उत्पादकांच्या अडचणींची जाण, कारखान्याच्या विकासाची दूरदृष्टी या मुद्द्यांचाही विचार व्हावा, अशी अपेक्षा सभासद व्यक्त करीत आहेत.
सुनेत्रा पवार यांच्यापुढे कसोटी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीत विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळविले आहेत. आता कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत अनुभवी, मातब्बर संचालक आहेत. त्यामुळे अध्यक्ष निवडीत नीरा नदी काठ की नीरा डावा कालवा परिसरात कोणाला संधी मिळणार, यावर सभासदांतून प्रतिक्रिया उमटत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यापुढे अध्यक्ष निवडीत कसोटी लागणार आहे.





