Koregaon Bhima : सणसवाडीच्या वीज समस्येवर मोठा दिलासा; उच्च दाब केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास गती
शिरूर-हवेली मतदारसंघातील वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर सणसवाडीसह वाघोली, रांजणगाव एमआयडीसी आणि परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Koregaon Bhima : शिरूर-हवेली मतदारसंघातील वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर सणसवाडीसह वाघोली, रांजणगाव एमआयडीसी आणि परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
आमदार माऊली कटके यांनी महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (CMD) विक्रम कुमार (भा.प्र.से.) यांची मुंबई येथील ‘प्रकाशगंगा’ कार्यालयात भेट घेऊन विविध प्रलंबित वीज प्रकल्पांचा पाठपुरावा केला.
या बैठकीत सणसवाडीच्या उच्च दाब केंद्रासह अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याने परिसरातील नागरिक आणि उद्योगांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
बैठकीत सणसवाडी येथील उच्च दाब केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यरत करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
या निर्णयामुळे सणसवाडीसह परिसरातील वारंवार उद्भवणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्या कमी होण्यास मदत होणार असून भविष्यात अधिक स्थिर, दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, हवेली तालुक्यातील वाघोली व पंचक्रोशी परिसरातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि भविष्यातील वीज गरजा लक्षात घेऊन सुमारे ९१ कोटी रुपये खर्चाच्या उच्च दाब केंद्राच्या (High Voltage Substation) प्रस्तावालाही तातडीने मंजुरी देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाघोली परिसरातील वाढत्या वीज ताणावर कायमस्वरूपी तोडगा निघण्यास मदत होणार असून नागरिक, व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना सातत्याने भेडसावणाऱ्या वीज समस्यांवर उपाय म्हणून ५० एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर तातडीने कार्यान्वित करण्याचे आश्वासनही बैठकीत देण्यात आले. यामुळे औद्योगिक क्षेत्राला अधिक सक्षम आणि स्थिर वीजपुरवठा उपलब्ध होऊन उत्पादनक्षमतेत वाढ होण्यास मदत होणार आहे.
यावेळी आमदार माऊली कटके यांनी शिरूर-हवेली मतदारसंघातील वाढते नागरीकरण, औद्योगिक विस्तार आणि भविष्यातील वीज गरजा लक्षात घेऊन सर्व प्रलंबित वीज प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी देण्याची मागणी केली. त्यावर महापारेषण प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला अखंडित, दर्जेदार व सुरक्षित वीजपुरवठा मिळावा, ही आमची प्राथमिकता आहे. शिरूर-हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक पायाभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, भविष्यातही जनहिताची विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.





