koregaon bhima crime | माजी उपसरपंच बनला गावचा गँगस्टर! पोलिसांनी बेड्या घालून गावातून काढली धिंड

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील माजी उपसरपंच असलेला सराईत गुन्हेगार गणेश फडतरे यासह त्याच्या साथीदारांनी एका चालकाला खंडणीसाठी अपहरण करुन मारहाण करीत गळ्यातील सोन्याची चैन काढून घेत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलिसांनी याबाबत गुन्हे दाखल करत माजी उपसरपंच व त्याच्या साथीदारांची गावातून चक्क धिंड काढली असल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
पोलिसांनी कोरेगाव भीमाचा माजी उपसरपंच गणेश भाऊसाहेब फडतरे वय ३४ वर्षे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे, विशाल बाळासाहेब शिवले वय ३४ वर्षे रा. वढू बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे यांच्या सह एक अनोळखी युवक यांच्या विरुद्ध खंडणी, अपहरण, मारहाण, जबरीचोरी प्रकरणी गुन्हे दाखल करत दोघांना तातडीने अटक केली.कोरेगाव भीमा येथील किऑन इंदोया प्रा. लिमिटेड कंपनीतील कॅन्टीन चालक रोहन शिंदे यांना माजी उपसरपंच, सराईत गुन्हेगार फडतरे याने वारंवार फोन करुन भेटण्याची विनंती केली होती.
त्यांनतर (दि.२४) रोजी सकाळी फडतरे, विशाल शिवले व त्यांच्या एका मित्राने कंपनीच्या गेटवर कॅन्टीन चालक रोहन शिंदे याला बोलावून घेत त्यांच्या जवळील गाडीमध्ये बसवून घेऊन जात त्याला दमदाटी करुन तुला या कंपनीत कॅन्टीन चालवायचे असेल तर आम्हाला महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागेल, असे म्हणत दांडक्याने मारहाण केली. दरम्यान फडतरे याने रोहन शिंदे यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची चैन व खिशातील दहा हजार रुपये असलेला पाकीट काढून घेतले.
रोहन या मारहाण करत याला आज संपवून टाकू, असे म्हणत तिघांनी बेदम मारहाण केली. रोहन शिंदे यांनी त्यांच्या तावडीतून पळून पोलिसांना फोन करत माहिती दिली. याबाबत रोहन प्रकाश शिंदे (वय ३९, रा. वाघोली, ता. हवेली) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. दरम्यान, पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड व त्यांच्या पथकाने कोरेगाव भीमा गावातून थेट माजी उपसरपंच गणेश फडतरे व विशाल शिवले यांची हातात बेड्या घालून त्यांची त्यांच्याच गावातून धिंड काढत त्यांची दहशत मोडून काढली आहे.
गणेश फडतरेचे अनेक कारनामे..
कोरेगाव भीमा गावचा माजी उपसरपंच असलेल्या गणेश फडतरे याच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचे पाच गुन्हे, गर्दी, मारामारी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर वाळू तस्करी करणे व अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हे दाखल असून त्याने अनेक वाहन चालकांना त्रास देऊन मारहाण केली आहे. यापूर्वी एका बड्या उद्योजकाला देखील दमदाटी केल्याची घटना घडलेली आहे. त्याच्या दहशतीमुळे अनेकांनी तक्रारी केल्या नसून गणेश फडतरे याचे आता अनेक कारनामे पुढे येणार आहे.





