Song Young Kyu Died : कोरियन अभिनेता सोंग यंग-क्यू यांचा मृतदेह कारमध्ये आढळला; चाहत्यांमध्ये शोककळा

Song Young Kyu Died :दक्षिण कोरियाचा लोकप्रिय अभिनेता सोंग यंग-क्यू यांचे निधन झाले असून, त्यांचा मृतदेह रविवारी कारमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 55 वर्षीय सोंग यंग-क्यू हे ग्योंगगी प्रांतातील योंगिन येथील एका टाउनहाऊसच्या आवारात कारमध्ये मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून, मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
चाहत्यांना मोठा धक्का
सोंग यंग-क्यू यांच्या मृत्यूने संपूर्ण कोरियन इंडस्ट्री आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. एक उत्तम अभिनेता आणि ओटीटीवरही आपली छाप पाडणारा कलाकार अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.
1994 पासून अभिनयाची सुरुवात
सोंग यंग-क्यू यांनी 1994 मध्ये ‘विझार्ड म्यूरल’ या चाइल्ड म्युझिक ड्रामामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी ‘ह्वारंग’, ‘बिग बेट’, ‘हॉट स्टोव लीग’ यांसारख्या के-ड्रामामधून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांनी विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरही काम करत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
वैयक्तिक आयुष्य आणि अलीकडील अडचणी
सोंग यंग-क्यू यांचं वैयक्तिक आयुष्य अलीकडे अनेक वादांमुळे चर्चेत आलं होतं. काही आठवड्यांपूर्वी नशेत कार चालविल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर त्यांना अनेक मालिकांमधून काढून टाकण्यात आलं होतं, आणि त्याच्या करिअरवरही परिणाम झाला होता.
सोंग यंग-क्यू यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. कुटुंबीयांनी अद्याप त्यांच्या मृत्यूबाबत कोणतंही अधिकृत विधान दिलेलं नाही.
पोलीस तपास सुरू
स्थानिक पोलिसांनी मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू केला असून, सर्व शक्य कोनातून चौकशी केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार मृत्यूच्या कारणाबाबत काहीही निष्पन्न झालेलं नाही.
सोंग यंग-क्यू यांचं अकाली निधन हे कोरियन मनोरंजन विश्वासाठी मोठं दुःखदायक आहे. त्यांची आठवण त्यांच्याच कामातून सदैव जिवंत राहील.





