Kondhwa to Yewalewadi Metro : कोंढवा ते येवलेवाडी मेट्रोचा नवा टप्पा; सरकारकडे मे-जूनपर्यंत प्रकल्प सादर करणार

Kondhwa to Yewalewadi Metro : हिंजवडी ते शिवाजीनगर 23 कि.मी. लांबीच्या मेट्रो मार्गिकेचा एक भाग असलेला कोंढवा ते येवलेवाडी हा २० कि.मी.चा टप्पा महा मेट्रोकडून पूर्ण केला जाणार आहे. यासाठी दोन महिन्यांपूर्वी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून सविस्तर प्रकल्प अहवाल मे-जूनपर्यंत सादर होण्याची अपेक्षा आहे.
राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. कोंढवा परिसरात मेट्रो नसल्याने नागरिकांना प्रवासात अडचणी येत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यास दक्षिण पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.
महामेट्रोकडून जाळे विस्तारले जात असताना पुढील टप्पा कोंढवा ते येवलेवाडी हा असणार आहे. नव्याने साकारला जाणारा हा प्रस्तावित मार्ग शिवाजीनगरपासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प आणि पुलगेट मार्गे कोंढवा व येवलेवाडीपर्यंत जाणार आहे.
साधारण प्रत्येक एक कि.मी. अंतरावर मेट्रो स्थानक असणार आहे, त्यामुळे परिसरातील रहिवाशांना सहज प्रवास करता येईल. या मार्गावरील हा प्रकल्प 2030-31 पर्यंत पूर्ण करण्याचा मेट्रोचा प्रयत्न असणार आहे.
महामेट्रोमार्फत कोंढवा ते येवलेवाडी या मार्गावर मेट्रो प्रकल्प आखला जात आहे तसेच, एनआयबीएम ते उंड्री या भागासाठीही विस्ताराचा विचार सुरू आहे. ज्योती चौक, एनआयबीएम जंक्शन आणि पुढे उंड्रीपर्यंत सेवा वाढवण्याचाही प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. याशिवाय कॅम्प-पुलगेट भागातून जोडणी करण्याचाही विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिकेचा विस्तार सार्वजनिक-खासगी भागीदारीत उभारला जात आहे. या सर्व योजनांमुळे शहरातील विविध भाग एकमेकांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जाणार आहेत. मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दक्षिण पुणेकरांना कमी वेळेत आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे.





