कोल्हापूर: ‘जयप्रभा’साठी साखळी उपोषण सुरू, स्टुडिओच्या दारात आंदोलन

कोल्हापूर – जयप्रभा स्टुडिओ हा शूटिंगसाठीच राहिला पाहिजे या मागणीसाठी साखळी उपोषण रविवारपासून (ता.१३ फेब्रुवारी) सुरू करण्यात आले. जोपर्यंत स्टुडिओत शूटिंगला सुरुवात होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण आंदोलन चालू राहील असा निर्धार कलाकार, तत्रंज्ञ व नागरिकांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर या ठिकाणी त्यांचे स्मारक करण्याचा प्रस्ताव पुढे आला. दरम्यान मंगेशकर यांच्या हयातीतच दोन वर्षापूर्वी या स्टुडिओची विक्री झाल्याचे सामोरे आले आहे. जयप्रभा स्टुडिओची जागा शूटिंगसाठी असावी, त्याठिकाणी शूटिंग सुरू करावे. स्टुडिओमधील इमारतीसह खुली जागा आरक्षित राहावी, व्यावसायिक कारणासाठी वापर होउ नये . स्टुडिओत मंगेशकर यांचे स्मारक साकारावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, कलाकार व तंत्रज्ञांनी तेरा फेब्रुवारीपासून स्टुडिओच्या दारात साखळी उपोषणाला सुरुवात केली. महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, सहखजिनदार शरद चव्हाण, संचालक रणजित जाधव, सतीश बीडकर, रवी गावडे, माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, इम्तियाज बारगीर, अभिनेता स्ववप्नी रााजशेखर, माजी नगरसेविका सुरेखा शहा, बाबा पार्टे, भूपाल शेटे, निर्माते विजय शिंदे, अर्जुन नलवडे, अमर मोरे, नृत्य दिग्दर्शक संग्राम भालकर, अमर मोरे, अवधूत जोशी आदींचा सहभाग होता.





