Kokan politics : ‘योगेश तू चिंता करू नको, हा एकनाथ तुझ्या पाठीशी’; शिंदेंचा योगेश कदमांना भक्कम पाठिंबा

Ratnagiri News : पावसाळी अधिवेशनात गृह आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यावर वाळू चोरी आणि डान्स बार प्रकरणात गंभीर आरोप झाले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनिल परब (Anil Parab) आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी कदम यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.
या आरोपांमुळे शिंदे गट आणि योगेश कदम बॅकफूटवर गेले होते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रत्नागिरीत जाऊन कदम यांची थेट पाठराखण करत, “योगेश, तू चिंता करू नको, हा एकनाथ शिंदे आणि अख्खी शिवसेना तुझ्या पाठीशी आहे,” असा शब्द देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
पावसाळी अधिवेशनात अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर दोन गंभीर आरोप करत महायुतीला कोंडीत पकडले. पहिल्यांदा, वाळू चोरीप्रकरणी परब यांनी विधानसभेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना आव्हान देत, “राज्यमंत्र्यांचे निलंबन करण्याची हिंमत दाखवणार का?” असा सवाल केला. बावनकुळे यांनी माहिती मागवून चौकशीचे आश्वासन देत वेळ मारून नेली.
दुसऱ्या प्रकरणात, कांदिवली येथील ‘सावली’ डान्स बारवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 22 बारबाला आणि 22 ग्राहकांना पकडले. हा बार योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावावर असल्याचा दावा परब यांनी विधानपरिषदेत केला. त्यांनी, “राज्यात डान्स बारवर बंदी असताना हा बार कसा चालतो?” असा सवाल उपस्थित करत कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही ‘सावली’ बारची पाहणी करत कदम यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यांनी ठाण्यात 15 डान्स बार सर्रास चालत असल्याचा आरोप करत गृहमंत्रालयाला पुरावे सादर केले. या सर्व घडामोडींमुळे योगेश कदम यांचा राजीनामा अटळ मानला जात होता.
शिंदेंचा ‘गॉडफादर’ अवतार
आरोपांचा भडिमार आणि राजीनाम्याच्या मागणीवर एकनाथ शिंदे सुरुवातीला शांत होते. मात्र, त्यांनी रत्नागिरीत योगेश कदम यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना भक्कम पाठिंबा जाहीर केला. शिंदे म्हणाले, “योगेश कदम हा काम करणारा कार्यकर्ता आहे. टीका करून काम थांबत नाही. जे दरोडेखोर आहेत, तेच दुसऱ्याला चोर म्हणतात. योगेशवर खोटे आरोप केले गेले आहेत. आरोप करणाऱ्यांनी स्वतः काय केलं, याचं उत्तर द्यावं.” त्यांनी थेट, “योगेश, तू चिंता करू नको, अख्खी शिवसेना आणि एकनाथ शिंदे तुझ्या पाठीशी आहे,” असा शब्द देत कदम यांना दिलासा दिला.





