ऐतिहासिक! आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर जाणारे पहिले भारतीय ठरणार शुभांशु शुक्ला, जाणून घ्या त्यांच्याविषयी

Shubhanshu Shukla: भारतीय हवाई दलाचे पायलट आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) गगनयान मोहिमेसाठी निवड झालेल्या शुभांशु शुक्ला यांच्या नावावर नवीन कामगिरीची नोंद होणार आहे. नासाच्या Axiom 4 मोहिमेसाठी शुभांशु शुक्ला यांची निवड झाली आहे.
शुभांशू शुक्ला हे नासाच्या Axiom 4 मोहिमेंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर जाणारे ते पहिले भारतीय असतील. तर अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय ठरणार आहेत. ते या मोहिमेसाठी स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळ यानाचे पायलट असतील. याआधी भारताकडून अंतराळात जाण्याची कामगिरी विंग कमांडर राकेश शर्मा यांनी केली होती. ते एप्रिल 1984 मध्ये अंतराळात गेले होते.
Axiom 4 मोहीम 14 दिवसांची असेल. या मिशनच्या प्रमुख पॅगी व्हिटसन या असतील. तर राकेश शर्मा यांच्याकडे पायलटची भूमिका असेल. या मिशनबाबत माहिती देताना नासाने सांगितले की, Axiom 4 पुढील काही महिन्यात फ्लोरिडा येथील नासाच्या कॅनेडी स्पेस सेंटर येथून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी (आयएसएस) उड्डाण घेईल.
या मोहिमेसाठी निवड झाल्यामुळे उत्साहित असल्याचे शुभांशू शुक्ला म्हणाले. याबाबत बोलताना ते म्हणाले की, मी या मोहिमेबद्दल खूप उत्साहित आहे. मला आशा आहे की ज्या प्रकारचे प्रशिक्षण मला मिळाले आहे, त्याद्वारे ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडता येईल.
कोण आहेत शुभांशू शुक्ला?
शुभांशु शुक्ला यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1985 ला लखनौ येथे झाला. त्यांनी एनडीएमधून लष्करी प्रशिक्षण घेतले आहे. जून 2006 ला ते हवाई दलाच्या लढाऊ विभागात दाखल झाले.
40 वर्षीय शुभांशु यांना 2000 तासांपेक्षा अधिकच्या उड्डाणाचा अनुभव आहे. सुखोई-30 एमकेआय, मिग-21एस, मिग-29एस, जॅग्वार, हॉक्स डोर्नियर्स आणि एन-32 सारखी लढाऊ विमानाच्या उड्डाणाचा अनुभव आहे. तसेच, भारताकडून आगामी काळात गगनयान मोहीमेची आखणी करण्यात आली आहे. या मोहिमेसाठीही त्यांची निवड झाली असून, यासाठी त्यांनी प्रशिक्षण देखील घेतले आहे.





