ISRO रचणार इतिहास, अंतराळात पाठवणार 2 उपग्रह, ‘या’ कारणांमुळे खास आहे मोहीम

ISRO Spadex Mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) आज (30 डिसेंबर) दोन उपग्रह लाँच करणार आहे. या मिशनला Spadex असे नाव देण्यात आले आहे. या उपग्रहांच्या मदतीने अंतराळात जोडणे व विलग होण्याच्या (डॉकिंग आणि अनडॉकिंग) तंत्रज्ञानाची चाचणी केली जाईल. ही मोहीम यशस्वी झाल्यास, अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील चौथा देश असेल. आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीनलाच अशी कामगिरी जमली आहे. इस्त्रोच्या अंतराळ स्टेशन उभारणे आणि चंद्रयान-4 साठी ही मोहीम महत्त्वाची आहे.
इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, पीएसएलव्ही रॉकेट एसडीएक्स-1 आणि एसडीएक्स-2 या दोन उपग्रहांना पृथ्वीच्या 476 किमी वर्तुळाकार कक्षेत पोहचवेल. त्यानंतर या दोन उपग्रहांच्या माध्यमातून ‘स्पेस डॉकिंग एक्सपरिमेंट’ला (स्पेडेक्स) जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होईल.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली की, या मोहिमेमुळे भारताला अंतराळात डॉकिंग तंत्रज्ञानाचा यशस्वीरित्या उपयोग करणाऱ्या देशांच्या यादीत स्थान मिळेल. भारताचे हे मिशन भविष्यातील प्रयत्नांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. चंद्रावरून माती आणणे, भारतीय अंतराळ स्टेशन उभारणे, चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळवीराला उतरवणे, या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची आहे.
एसडीएक्स-1 उपग्रह हाय-रिझॉल्यूशन कॅमेऱ्याने (HRC) सुसज्ज आहे. तर एसडीएक्स-2 मध्ये मिनिएचर मल्टीस्पेक्ट्रल पेलोड आणि रेडिएशन मॉनिटर (रेडमॉन) दिले आहे. हे पेलोड उच्च-रिझॉल्यूशन फोटो, नैसर्गिक संसाधनांचे निरीक्षण आणि इन-ऑर्बिट रेडिएशनसंबंधित डेटा प्रदान करेल, ज्यामुळे भविष्यातील मोहिमांमध्ये याचा उपयोग होईल.





