“अर्णब गोस्वामीला अटक झाल्यानंतर किरीट सोमय्या जागे झाले आहेत”

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर भाजपाकडून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजपा आक्रमक झाली असून किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबात जमिनीचे २१ व्यवहार झाल्याचा दावा केला आहे.
यानंतर अन्वय नाईक कुटुंबीयांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना यासंबंधी खुलासा केला आहे. “किरीट सोमय्या आधी झोपले होते. पण अर्णब गोस्वामीला अटक झाल्यानंतर जागे झाले आहेत,” असा टोला आज्ञा नाईक यांनी लगावला आहे.
“किरीट सोमय्या आधी झोपले होते. पण अर्णब गोस्वामीला अटक झाल्यानंतर जागे झाले आहेत,” अशी टीका आज्ञा नाईक यांनी केली आहे. “लोक कित्येक वस्तू विकत घेतात. या वस्तूंशी हा संबंध नाही. माझ्या घरातील दोन माणसं गेली आहेत. किरीट सोमय्यांनी जमिनीच्या व्यवहाराशी त्याची तुलना करु नये. एक आई आणि तिचा मुलगा गेला आहे. त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नका. बोबडी वळली आहे, आवाज बंद होण्यास वेळ लागणार नाही,” असा इशारा अक्षता नाईक यांनी यावेळी किरीट सोमय्या यांना दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयासोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. यावरही त्यांनी भाष्य केले आहे. किरीट सोमय्या दावा करत असलेले जमिनीचे व्यवहार झाले असल्याची माहिती अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी दिली आहे.
“मला बऱ्याच लोकांकडून कळले असून व्हिडीओदेखील पाहिला आहे. पण याच्यात गुपीत असं काहीच नाही. त्यांनी आमच्याकडून जागा विकत घेतली आणि आम्ही ती दिली. किरीट सोमय्या जे सातबारे दाखवत आहेत ती खुली कागदपत्रं असतात. महाभूमीच्या वेबसाईटवर गेलात तरी तुम्हाला ती मिळतील. त्यामुळे ही अशी खुली कागदपत्रं जाहीर केल्याबद्दल मी किरीट सोमय्यांचे आभार मानते,” असा टोला आज्ञा नाईक यांनी लगावला आहे.
“जमीन कोणी विकत का देऊ शकत नाही? हा योग्य मार्गाने झालेला व्यवहार आहे. यामध्ये किरीट सोमय्यांना आता का समस्या जाणवत आहे. त्याचा आत्महत्येच्या प्रकरणाशी काय संबंध आहे. किरीट सोमय्या नेमकं काय दाखवू इच्छित आहेत?,” अशी विचारणा आज्ञा नाईक यांनी केली आहे. “किरीट सोमय्या यांना काही मदत हवी असेल तर मी स्वत: हजर होईल, तुम्ही कधीही बोलवा,” असेही त्यांनी म्हटले आहे.
“किरीट सोमय्या यांना राजकारण करायचं असेल तर ते काहीही मुद्दे आणू शकतात. पण हे आत्ता आणण्यामागचे काय प्रयोजन आहे हे मलाच विचारायचे आहे? गुन्हेगार अर्णब गोस्वामीला पाठीशी का घालताय?,” अशी विचारणा आज्ञा नाईक यांनी केली आहे. तर दुसरीकडे अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी ५ मे २०१८ ला जेव्हा आम्ही अग्नी दिला तेव्हा किरीट सोमय्या कुठे गेले होते? त्यांची बोबडी वळली होती का? अशी विचारणा केली.





