Kinshuk Vaidya: ‘शाका लाका बूम बूम’चा संजू झाला बाबा! किंशुक वैद्यच्या घरी गोजिरवाण्या मुलाचे आगमन
Kinshuk Vaidya किंशुक वैद्यने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक अतिशय गोड फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये नवजात बाळाचा छोटासा हात दिसत आहे. त्या हाताला आई आणि वडील दोघेही प्रेमाने धरून आहेत.

Kinshuk Vaidya: टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘शाका लाका बूम बूम’ मधील संजू या भूमिकेमुळे घराघरात ओळख मिळवणारा अभिनेता किंशुक वैद्य आता वडील झाला आहे. किंशुक आणि त्याची पत्नी दीक्षा नागपाल यांच्या आयुष्यात नव्या आनंदाचे आगमन झाले असून दीक्षाने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी किंशुकने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली.
किंशुक वैद्यने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक अतिशय गोड फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये नवजात बाळाचा छोटासा हात दिसत आहे. त्या हाताला आई आणि वडील दोघेही प्रेमाने धरून आहेत. या फोटोमधूनच त्यांच्या आयुष्यातील या खास क्षणाची झलक पाहायला मिळते.
View this post on Instagram
फोटोसोबत किंशुकने भावनिक कॅप्शनही लिहिले आहे. त्याने लिहिले, “खूप प्रेम आणि कृतज्ञतेसह आम्ही आमच्या बेबी बॉयचे स्वागत करतो. बेबी वैद्य आला आहे. ०८.०३.२६.” ही पोस्ट समोर येताच चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी या नव्या आई-वडिलांना शुभेच्छांचा वर्षाव केला.
किंशुकच्या पोस्टवर अभिनेता आर्य बब्बरने नजर लागू नये असा इमोजी आणि हृदयाचा इमोजी टाकत शुभेच्छा दिल्या. तर अभिनेत्री दिशा परमारनेही कमेंट करत “खूप खूप अभिनंदन” असे लिहिले. याशिवाय अनेक चाहत्यांनीही आनंद व्यक्त करत वैद्य कुटुंबातील नव्या सदस्याचे स्वागत केले.
View this post on Instagram
दरम्यान, किंशुक आणि दीक्षाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती की ते आई-वडील होणार आहेत. त्यावेळी त्यांनी सोशल मीडियावर एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये दोघेही हातात लहानसे बाळाचे बूट धरून उभे असल्याचे दिसत होते. त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले होते की, “आम्ही आयुष्यातील एका नव्या टप्प्यात पाऊल ठेवत आहोत… आमची प्रेमकथा आता आणखी सुंदर होणार आहे.”
किंशुक आणि दीक्षा यांची प्रेमकहाणीही अनेकांना प्रेरणा देणारी मानली जाते. दोघे काही वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांनी साखरपुडा केला. पुढे २२ नोव्हेंबर २०२४ रोजी अलिबाग येथे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी लग्नगाठ बांधली.
View this post on Instagram
लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्या आयुष्यात ही आनंदाची बातमी आली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्येही मोठा उत्साह दिसून येत आहे. सोशल मीडियावर अनेकजण किंशुक आणि दीक्षाला शुभेच्छा देत आहेत.
बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या किंशुक वैद्यने ‘शाका लाका बूम बूम’ या मालिकेत संजूची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आजही अनेकांना त्याची ती भूमिका आठवते. आता मात्र अभिनेता म्हणूनच नव्हे तर वडील म्हणून त्याच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू झाला आहे.





