राज्यात ९ महिन्यांत ४ नेत्यांची हत्या; शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सुरक्षा चव्हाट्यावर !

मुंबई – आगामी विधानसभा निवडणूक आणि ऐन दस–याच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात गेल्या नऊ महिन्यांत चार राजकीय नेत्यांची हत्या करण्यात आली आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर चांगलीच खळबळ उडाली असून या हत्येमुळे सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली असून सत्ताधा-यांनी पायउतार व्हावे, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे.
वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळीबार करून हत्या करण्यात आली. वाय दर्जाचे संरक्षण असूनही बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली.
दरम्यान, ७ फेब्रुवारी २०२४ रोजी चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. यात उपचारादरम्यान महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला होता.
९ फेब्रुवारी २०२४ रोजी फेसबुक लाईव्ह करत दहिसरमध्ये शिवसेनेच्या अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा ऊर्फ मॉरिस भाई याने अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली.
यानंतर मॉरिसने आत्महत्या केली. यानंतर ४ ऑक्टोबर २०२४ रोजी भायखळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मा यांची हत्या करण्यात आली होती.
सचिन कुर्मा यांच्यावर भायखळामधील म्हाडा कॉलनीत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. यानंतर बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली यामुळे महाराष्ट्र हादरला असून, सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.





