एकतर्फी प्रेमातून केली तीन जणांची हत्या; नव्या कायद्यानुसार महिनाभरातच ठरवण्यात आले दोषी

नवी दिल्ली – भारतीय न्याय संहिता देशात लागू करून काहीच दिवस झाले असताना या कायद्यानुसार आरोपीला शिक्षा ठोठावण्याचा पहिला निर्णयही समोर आला आहे. हत्येच्या एका प्रकरणात न्यायालयाने एकाला दोषी ठरवले आहे. नव्या कायद्यानुसार ५ सप्टेंबर रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार या प्रकरणात केवळ १५ दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात आले होते आणि आता एका महिन्याच्या आत न्यायालयाचा निर्णय आला आहे. इतक्या कमी कालावधीत आरोपीला शिक्षा सुनावली जाणे हा एक इतिहास झाला आहे.
बिहारच्या छपरा जिल्ह्यातील घानाडिह येथे १७ जुलै रोजी तीन जणांची हत्या झाली होती. एकतर्फी प्रेमात वेडा झालेल्या रोशन आणि सुधांशु यांनी अंकित नावाच्या त्यांच्या आणखी एका साथीदारासह चांदनी, तिची बहिण आभा आणि त्यांचे पिता तारकेश्वर सिंह यांची चाकूने भोसकून हत्या केली होती. तारकेश्वर यांची पत्नी शोभा देवी सुदैवाने या हल्ल्यातून बचावली. शोभा यांनी रोशन, सुधांशु आणि अंकित यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आरोपींना ताबडतोब अटक करून पंधरा दिवसांच्या आतच आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने अत्यंत जलद गतीने सुनावणी घेत एका महिन्यांतच आरोपींना दोषी ठरवले. आरोपींच्या वकिलाने या प्रकरणात अनेक जणांची साक्ष करवली. त्यांनी इतरही प्रयत्न केले, मात्र न्यायालयाने आरोपींचा दोषी ठरवले. आता ५ सप्टेंबर रोजी दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. तर शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे आरोपींच्या वकिलाने म्हटले आहे.





