पुणे | ससूनमध्ये किडनी प्रत्यारोपण यशस्वी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मेंदूमृत १३ वर्षीय तरुणाच्या अवयवदानामुळे पुण्यातील किडनी आजाराने त्रस्त असलेल्या मुलीवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. ससून रुग्णालयात ही शस्त्रक्रिया झाली.
दौंड तालुक्यातील १३ वर्षीय मुलगी किडनी आजाराने त्रस्त असल्याने डायलिसीस सुरू होते. अनेक महिन्यांपासून ती किडनीच्या प्रतीक्षेत होती.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात रक्तस्राव झाल्याने मेंदूमृत (ब्रेनडेड) मुलाच्या नातेवाइकांनी अवयवदानाला संमती दिल्यावर त्यातील एक किडनी ससून रुग्णालयात पाठविण्यात आली. त्यासाठी मूत्ररोग शल्यचिकीत्सा तज्ज्ञ डॉ. राजेश श्रोत्री, तज्ञ डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. हर्षद तोष्णीवाल, डॉ. विवेक बारेकर, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. संदीप मोरखंडीकर, डॉ. एन. सी. अंबेकर,
व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. दानिश कामीरकर, शल्यचिकीत्सक डॉ. अनंत बीडकर, भूलतज्ञ डॉ. संयोगिता नाईक, भूलतज्ञ डॉ. विजय पाटील आणि डॉ. सुजित क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. किडनी प्रत्यारोपण यशस्वी होण्यासाठी समन्वयक म्हणून सत्यवान सुरवसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
ससून रुग्णालयामध्ये कमीत कमी खर्चात किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात येत आहेत. सन २०१६ मध्ये प्रथमता कॅडेव्हर किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आले.
तेव्हापासून आजपर्यंत १५ रुग्णांवर कॅडेव्हर टू लाइव्ह किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आलेल्या आहेत, तसेच लाइव्ह टू लाइव्ह शस्त्रक्रिया प्रथमत: सन २०१८ मध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर किडनी प्रत्यारोपणाच्या १६ रुग्णांवर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या आहेत, असे ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी सांगितले.




