खोक्या भोसले अद्यापही फरार; न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी केला अर्ज, पोलिसांना शोध घेण्यात अपयश

Satish Bhosle | भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले मागील पाच दिवसांपासून फरार आहे. सतीश भोसलेने बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटने बेदम मारहाण केली होती. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर खोक्याकडून पैशांचे बंडल फेकणे, हेलिकॉप्टरमधून उतरणे, असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते.
इतकेच काय तर त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर वन विभागाला वाळलेले मांस, हत्यार, शिकारीचे जाळे आणि इतर साहित्य आढळले होते. तसेच दिलीप ढाकणे व महेश ढाकणे यांना कुऱ्हाड व सत्तूरने बेदम मारहाण त्याने केली होती. याप्रकरणी वन विभागात 1, शिरूरमध्ये 2 असे एकुण तीन गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
सतीश भोसलेचा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज
शिरूर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर सतीश भोसले मागील पाच दिवसांपासून फरार आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांची दोन पथके रवाना असून अद्याप पोलिसांना तो सापडलेला नाही. तर सतीश भोसलेने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असल्याची माहिती समोर आली आहे. बीड जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन वकिलाच्या मार्फत दाखल केला आहे. बीड जिल्हा सत्र न्यायालयात आज दुपारी होणार अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
कोण आहे सतीश भोसले ?
सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद होते. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे. तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले. अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे.
सतीश भोसलेने शिरुर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. सतीश भोसलेने केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान खोक्या भाईला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या राजदूतांची फजिती ! अमेरिकेने देशात प्रवेश नाकारला, विमानतळावरूनच माघारी पाठवले





