IND vs PAK : ‘आमचे खेळाडू खेळतात कमी अन् बोलतात जास्त’, बाबरने विराटकडून शिकावे – युनूस खान

IND vs PAK : – खराब फॉर्मशी झगडत असलेल्या बाबर आझमला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू युनूस खान यांनी विराट कोहलीकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे. युनूस म्हणाले, बाबर आणि इतर आघाडीच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली तर संघ अधिक चांगले निकाल देऊ शकेल… आमचे खेळाडू खेळतात कमी बोलतात जास्त, असेही मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे.
पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबरने गेल्या 16 कसोटी डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावलेले नाही. युनूसच्या मते, बाबर आझमला 2019 मध्ये संघाचा कर्णधार बनवण्यात आले कारण तो त्यावेळी संघातील सर्वोत्तम फलंदाज होता. बाबर आझम गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंजत असून त्याच्यावर सतत दबाव आहे. अलीकडेच त्याने देशांतर्गत चॅम्पियन्स चषक स्पर्धेत दमदार खेळी केली आहे.
युनूस पुढे बोलताना म्हणाले, बाबरने लहान वयात खूप काही मिळवले आहे, पण त्याला पुढे काय करायचे आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. कर्णधार ही छोटी गोष्ट आहे, कामगिरी महत्त्वाची आहे. विराट कोहलीला बघा, त्याने स्वतःच्या अटींवर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि आता तो जगभरात विक्रम मोडत आहे. देशासाठी खेळण्याचा पहिला विचार व्हायला हवा, हे यावरून दिसून येते.
क्रिकेटवर लक्ष केंद्रित करा…
पाकिस्तानमधील एका कार्यक्रमादरम्यान युनूस खान म्हणाले, बाबरला माझा एकच सल्ला आहे की त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे. त्याने आपली कामगिरी सुधारली पाहिजे. बाबर आझमला कर्णधार करण्यात आले कारण तो त्यावेळचा सर्वोत्तम खेळाडू होता. संघातील सर्वोत्तम खेळाडूला कर्णधार बनवायचे ठरले तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. बाबर आणि इतर खेळाडूंनी मैदानावर चांगली कामगिरी केली तर त्याचे परिणाम सर्वांना दिसतील. मी पाहिले आहे की आमचे खेळाडू कामगिरीपेक्षा जास्त बोलतात.





