Khawaja Asif : दहशतवाद्यांना पोसल्याची पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली कबुली

लंडन : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आज पाकिस्तानकडून पूर्वी दहशतवाद्यांना अर्थ सहाय्य आणि प्रशिक्षण पुरवले गेल्याची उघड कबुलीच दिली. पाकिस्तानकडून पाश्चात्य देशांसाठी पूर्वी हे अत्यंत घाणेरडे काम केले गेले. मात्र त्याचा पाकिस्तानलाच त्रास झाल्याचे आसिफ म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ख्वाजा आसिफ यांनी ही कबुली दिली.
स्काय न्यूज या वृत्तवाहिनीवरून ही मुलाखत नुकतीच प्रसारित करण्यात आली. मुलाखतकार याल्दा हकिम यांनी दहशतवादाबाबत आसिफ यांना प्रश्न विचारला होता. अलिकडेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरील प्रतिक्रिया विचारत असताना त्यांनी दहशतवादाबाबतच्या भूमिकेविषयी देखील थेट प्रश्न विचारला होता. पाकिस्तानने खूप पुर्वीपासून दहशतवादाला पाठिंबा, प्रशिक्षण आणि अर्थसहाय्य दिले आहे, हा दावा तुम्हाला मान्य आहे का, असे हकिम यांनी विचारले होते.
त्यावर हे घाणेरडे काम आम्ही ब्रिटन आणि अमेरिकेसह पाश्चात्य देशांसाठी जवळस ३ दशकांपासून करत आहोत, असे उत्तर ख्वाजा आसिफ यांनी दिले. ही एकचूक होती आणि त्याचा आमच्या देशाला खूप त्रास झाला. त्याचमुळे आमच्यावर हा आरोप केला जातो आहे. जर आम्ही सोव्हिएत रशियाविरुद्धच्या युद्धात सामील झालो नसतो आणि नंतर ९-११ नंतरच्या युद्धात सामील झालो नसतो, तर पाकिस्तानचा ट्रॅक रेकॉर्ड हा एक निर्दोष ट्रॅक रेकॉर्ड असता, असे ते म्हणाले. प्रदेशामध्ये जे काही होते, त्यासाठी पाकिस्तानला सोईस्करपणे जबाबदार धरले जाते.
जेव्हा आम्ही त्यांच्या बाजूने सोव्हिएत संघाविरोधात युद्ध लढत होतो, तेंव्हा हे सर्व दहशतवादी जिंकत होते आणि वॉशिंग्टनमध्ये मेजवानी झोडत होते. त्यानंतर ९-११ च्या वेळी देखील तसेच झाले. आमच्या सरकारने ती चूक पुन्हा केली. पाकिस्तानचा वापर केला गेला, असे आसिफ म्हणाले. पहलगाममधील हल्ला लष्कर ए तोयबाशी संबंधित द रेसिस्टन्स फ्रन्ट या गटाने केल्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारला असता. पाकिस्तानमध्ये लष्कर ए तोयबा अस्तित्वातच नाही, असे उत्तर देखील ख्वाजा आसिफ यांनी दिले.





