satara | जिल्ह्यात १ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी

सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सध्या पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. आतापर्यंत १ लाख ४९ हजार ३९४ हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. धुळवाफेवर पेरणी केलेल्या पिकांची उगवण क्षमता चांगली असून सर्वात जास्त सोयाबीनची पेरणी झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यानंतर जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला.मान्सूनच्या पावसानेही सर्वत्र हजेरी लावली आहे. त्यामुळे शेत शिवारात पेरण्यांची मोठ्या प्रमाणात लगबग सुरू आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाचे ३ लाख ८६ हजार ९७३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून प्रत्यक्ष १ लाख ४९ हजार ३९४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पुर्ण झाली आहे.
जिल्ह्यात भात १६ हजार ८६४, ज्वारी ३ हजार ७८६, बाजरी २३ हजार ३००, नागली. ८२७, मका ५ हजार ४८२,मूग ४८०, उडीद ३३२, सोयाबीन ६० हजार ५९३, इतर कडधान्य ११ हजार ६८४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पुर्ण झाली असून अद्यापही पेरण्याची लगबग शेतशिवारात सुरू आहे. ८६ हजार ५५५ हेक्टर क्षेत्रावर आडसाली ऊसाची लागण करण्यात आली असल्याचे श्री. माइनकर यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यत खरीप हंगामात सातारा तालुका ३३ टक्के, जावळी ३० टक्के, पाटण २० टक्के, कराड ४६ टक्के, कोरेगाव २७ टक्के, खटाव ३७ टक्के, फलटण १६ टक्के, खंडाळा ३८ टक्के, वाई २४ टक्के, महाबळेश्वर ११ टके असे मिळून ३९ टक्के पेरणीपूर्ण झाली आहे. -विजय माईनकर (जिल्हा कृषी विकास अधिकारी)





