Kharadi Cylinder Blast : देवासमोर दिवा लावला अन्…; खराडीतील सिलेंडर स्फोटाबाबत धक्कादायक माहिती समोर
Kharadi Cylinder Blast : स्फोट इतका तीव्र होता की घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, दरवाजे उखडले गेले आणि संपूर्ण हॉल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला.

Kharadi Cylinder Blast – खराडीच्या खांदवेनगरमधील फॉर्च्युन सिटी सोसायटीतील गीते कुटुंबासाठी शुक्रवारचा दिवस इतर दिवसांप्रमाणेच सुरू झाला. वृंदावनी गीते सकाळी नाश्ता तयार करण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या असता सिलिंडर रिकामा असल्याचे लक्षात आले. त्यांनी मुलगा पांडुरंगला नवीन सिलिंडर जोडण्यासाठी बोलावले.पांडुरंग नवीन सिलिंडर बसविताना त्यातून गॅस गळती होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सर्वांच्या सुरक्षेचा विचार करून त्यांनी सिलिंडर बाहेर हॉलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. मात्र गॅस मोठ्या प्रमाणावर पसरला होता. याचवेळी अचानक कुठल्यातरी विद्युत उपकरणातून किंवा अन्य स्रोतामधून ठिणगी पडली आणि क्षणार्धात प्रचंड स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, दरवाजे उखडले गेले आणि संपूर्ण हॉल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला.
पांडुरंग, त्यांचे वडील विष्णू आणि आई वृंदावनी हे तिघेही आगीच्या झळा आणि स्फोटाच्या तडाख्यात गंभीर जखमी झाले. अग्निशमन दलाने जखमींना तातडीने ससूनमध्ये दाखल केले. गंभीर भाजलेल्या पांडुरंग, विष्णू, वृंदावनी गीते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पांडुरंग एका आयटी कंपनीत कामाला होते. विष्णु हे कॅब चालक म्हणून निवृत्त झाले होते.
मुलीचा थरारक बचाव
स्फोटानंतर घराला धूर आणि ज्वाळांनी वेढा घातला. त्यावेळी पांडुरंग यांची पत्नी आणि सहा वर्षांची मुलगीही आतल्या खोलीत होती. जीवघेण्या परिस्थितीत अडकलेल्या आईने धैर्य दाखवत प्रथम मुलीचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतला. गॅलरीखाली नागरिकांची गर्दी जमा झाल्याचे पाहून तिने मुलीला खाली नागरिकांच्या दिशेने सोडले. नागरिकांनी तिला अलगद झेलल्यामुळे मुलीचे प्राण वाचले.
मुलीला किरकोळ दुखापत झाली असून ती सुरक्षित आहे. त्यानंतर पांडुरंग यांच्या पत्नीनेही धुराच्या, आगीच्या विळख्यातून स्वतःची सुटका करून घेतली. याप्रकरणाचा तपास खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रमोद सोनवणे यांनी सांगितले की, आग पूर्णपणे विझवून कुलिंगचे काम केले आहे. प्राथमिक तपासात गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचे दिसून येते. मात्र, नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होईल. पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून या दुर्घटनेचा तपास सुरू आहे.
देवासमोर दिवा लावला अन्
स्वयंपाकगृहात जाण्याआधी वृंदावनी यांनी देवासमोर दिवा लावला. यामुळे त्याची धग लागून लिकेज झालेला गॅस भडकून सिलेंडरचा स्फोट झाल्याची एक शक्यता वर्तवली जात आहे. पांडूरंग यांनी सिलेंडर जेव्हा हॉलमध्ये आणला तेव्हा तेथे त्यांचे वृध्द वडील विष्णु होते. घटनेत कोणालाही बचावाची संधी मिळाली नाही.






