Khandala Lake – जागतिक स्तरावर पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा शहरात सध्या खंडाळा लेक येथील बोटिंग क्लब परिसराची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची मोठी गर्दी होत असताना मूलभूत सोयीसुविधांचा पूर्णतः अभाव असल्याने पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाचा तडाखा वाढत असताना काहीसा गारवा मिळावा म्हणून पर्यटक मोठ्या संख्येने खंडाळा लेककडे आकर्षित होत आहेत. मात्र त्यांचे स्वागत अस्वच्छता, मोडकळीस आलेल्या सुविधा आणि प्रशासनाच्या उदासीनतेने होत आहे. पर्यटकांसाठी उभारण्यात आलेले एकमेव स्वच्छतागृह सध्या बंद अवस्थेत आहे. तलावाच्या अगदी शेजारी असलेल्या या स्वच्छतागृहात पाणीपुरवठा नसल्याने त्याला कुलूप ठोकण्यात आले आहे. खंडाळा लेक परिसराची दुरावस्था. विशेष म्हणजे, महिला आणि लहान मुलांची मोठी वर्दळ असलेल्या या ठिकाणी स्वच्छतागृहच उपलब्ध नसणे ही अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणी बाब मानली जात आहे. त्यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. परिसरातील इतर सुविधांची स्थितीही तितकीच चिंताजनक झाली आहे. पर्यटकांना बसण्यासाठी लावण्यात आलेली बाकडे अनेक ठिकाणी तुटलेली असून वापरण्यायोग्य नाहीत. कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या डस्टबिनची मोडतोड झाली आहे, तर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरून पर्यावरणावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. तलावाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी बसवण्यात आलेली कारंजी सध्या केवळ नावापुरतीच उरली आहेत. काही कारंजी बंद अवस्थेत पडली आहेत, तर काही तलावात पडून गंजत आहेत. याकडे प्रशासनाने पूर्णपणे पाठ फिरवल्याचे दिसते. या सर्व प्रकारामुळे खांडाळा लेकचे सौंदर्य हरवले असून पर्यटकांकडून याबाबत निराशा व्यक्त होत आहे. पर्यटकांची सुरक्षा धोक्यात सर्वात धोकादायक बाब म्हणजे बोटिंगसाठी वापरला जाणारा चौथरा अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. या चौथऱ्याची मजबुती कमी झाल्याने तो कधीही कोसळू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा गंभीर धोका असूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसत आहे. याशिवाय, रात्रीच्या वेळी परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरते. पथदिवे बंद असल्याने पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागतो. लोणावळा नगरपरिषदेचा मोठा साइनबोर्ड देखील रात्री बंद असतो, ज्यामुळे परिसर ओळखणे कठीण होते आणि सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनतो.