iran us war : खामेनींचा अमेरिकेला थेट इशारा..! युद्धबंदीनंतर पुन्हा दिली हल्ल्याची धमकी

दुबई : इराणने कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ला करून अमेरिकेच्या तोंडावर चपराक मारली आहे आणि पुढील कोणत्याही हल्ल्यांविरुद्ध इस्रायलचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इशारा दिला आहे. इराण आणि इस्रायल दरम्यान १२ दिवसांच्या युद्धानंतर युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर गुरुवारी दिलेल्या त्यांच्या पहिल्याच सार्वजनिक वक्तव्यात त्यांनी हा इशारा दिला आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून खामेनी यांचा व्हिडीओ संदेश प्रसारित करण्यात आला.
अवघ्या १० मिनिटांचे हे भाषण इस्रायल आणि अमेरिकेसाठीच्या धमक्या आणि इशाऱ्यांनी भरलेले होते. अमेरिकेने इराणच्या तीन अणू प्रकल्पांवर टाकलेल्या बंकर बस्टर बॉम्बच्या कारवाईवर खामेनी यांनी जोरदार टीका केली. हे अणू प्रकल्प पुर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा अतिरंजित आहे.
अमेरिकेला काहीही महत्त्वाचे साध्य करता आले नाही, असे ते म्हणाले. मात्र इराणच्या अणू कार्यक्रमाबद्दल किंवा अणू कार्यक्रमांच्या सध्याच्या स्थितीबद्दल त्यांनी कोणताही तपशील सांगितला नाही. मात्र जर कोणताही आक्रमक हल्ला झाला तर शत्रूला निश्चितच मोठी किंमत मोजावी लागेल, असे ते म्हणाले. कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळांबाबत त्यांनी केलेली टिप्पणी ही अमेरिकेच्या म्हणण्यापेक्षा विपरीत होती.
अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये इराणच्या अणू प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या आण्विक देखरेख संस्थेने म्हटले आहे. इराणी अणु केंद्रांवर इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे झालेले नुकसान खूपच मोठे आहे, असे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे संचालक राफेल ग्रोसी यांनी गुरुवारी पुन्हा सांगितले.
या प्रकल्पांचे खूप नुकसान झाल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ईस्माईल बाघेई यांनीही मान्य केले आहे. दिनांक १३ जून रोजी इस्रायलने इराणी अणु प्रकल्पांवर हल्ला केला आणि उच्च लष्करी कमांडर आणि शास्त्रज्ञांना लक्ष्य केले तेव्हापासून खामेनी यांनी एका गुप्त ठिकाणी आश्रय घेतला होता. तेंव्हापासून ते सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत.





