लंडन : चॅथम हाऊस थिंक टँकमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एका विशेष कार्यक्रमात भाग घेतला. या कार्यक्रमानंतर ते आपल्या वाहनात बसण्यसाठी जात असतानाच निदर्शने करणाऱ्या खलिस्तानी निदर्शकांनी घोषणाबाजी करत गोंधळ केला. तसेच एका खलिस्तानी निदर्शकाने त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, या घटनेबद्दल ब्रिटन सरकारने दिलगिरी व्यक्त केली. युनायटेड किंग्डमच्या भेटीदरम्यान परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी यूकेचे पंतप्रधान केयर स्टारमर, परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी आणि इतर अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती. या कार्यक्रमानंतर ते इमारतीतून बाहेर पडताच. तिथे उपस्थित असलेले खलिस्तानी झेंडे घेऊन घोषणाबाजी करत होते. जयशंकर हे त्यांच्या गाडीकडे जात असताना एका खलिस्तानी निदर्शकाने धावत त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान एका खलिस्तानी निदर्शकाने तिरंगा फाडला. यावर परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, परराष्ट्रमंत्र्यांच्या यूके दौऱ्यादरम्यान चॅथम हाऊसच्या बाहेर घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. शांततापूर्ण निषेधाचा अधिकार यूके कायम ठेवत असला तरी, सार्वजनिक कार्यक्रमांवेळी धमकावण्याचा किंवा व्यत्यय आणण्याचा कोणताही प्रयत्न पूर्णपणे अस्वीकार्य आहे, असे नमूद करत निषेध नोंदविला.