खलिस्तानवादी संघटनांना मोदी सरकारचा दणका; 12 वेबसाइट्स बंद

नवी दिल्ली – खलिस्तानचा पुरस्कार करणाऱ्या 12 वेबसाइट केंद्र सरकारने बंद केल्या आहेत. यातील काही वेबसाइट खुद्द खलिस्तानवादी संघटनांकडूनच चालवल्या जात होत्या. त्यात शीख फॉर जस्टीस नावाच्या संघटनेचाही समावेश होता.
इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशानुसार आयटी ऍक्टच्या कलम 69 ए अंतर्गत या वेबसाइट्स बंद करण्याचा आदेश देण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. केंद्र सरकारचे हे मंत्रालय सायबर स्पेसमधील कंटेटवर लक्ष ठेवून असते. आक्षेपार्ह कंटेट किंवा पोस्ट तसेच वेबसाईट बंद करण्याचा अधिकार या मंत्रालयाला आहे.
केंद्र सरकारने शीख फॉर जस्टीस या संघटनेवरच मागच्यावर्षी बंदी घातली आहे, पण त्याच नावाने त्यांची वेबसाईट मात्र सुरू ठेवण्यात आली होती. या संघटनेशी संबंधित चाळीस वेबसाइट गेल्या जुलै महिन्यात बंद करण्यात आल्या होत्या.





