पिंपरी | खडकी स्टेशन होणार खडकी टर्मिनल

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड आणि पिंपरी येथे काही रेल्वे गाड्यांना थांबा आहे. मात्र, सर्वच रेल्वे गाड्या येथे थांबत नसल्याने पुणे स्टेशन येथे जावे लागते. मात्र, आता रेल्वेच्या खडकी टर्मिनलवर लवकरच दोन प्लॅटफॉर्म वाढवले जाणार आहेत.
त्यासाठी ३६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. खडकी येथे प्लॅटफॉर्म वाढविल्यास पिंपरी चिंचवडकरांना पुण्यापर्यंत जावे लागणार नाही. तसेच, पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे गाड्यांचा आणि प्रवाशांचा ताण काहीसा कमी होणार आहे.
पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. दिवसाला सुमारे २०० ते २३० रेल्वे गाड्यांची येथून ये-जा असते. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर मोठा ताण येत आहे. येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी होत. त्यामुळे अनेक समस्यांना रेल्वे प्रशासनाला आणि प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांवरील प्लॅट फॉर्म वाढवण्याचे नियोजन करत येत आहे.
शहरातील लांब पल्ल्याच्या प्रवाशांना फायदा
अनेक एक्स्प्रेस गाड्यांना फक्त पुण्यातच थांबा आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी पिंपरी चिंचवड शहरातील प्रवाशांना पुण्यात जावे लागते. परिणामी त्यांचा वेळ व पैसा वाया जातो. तसेच अनेकदा गाडी चुकते.
त्यामुळे शहरात टर्मिनल करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. शहरात टर्मिनल झाले नसले किंवा लांब पल्ल्याच्या रेल्वेंना शहरात थांबा मिळाला नसला तरी शहराच्या जवळ असलेल्या खडकी येथे होणाऱ्या टर्मिनलचा पिंपरी-चिंचवडकरांना फायदा होईल.
महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबे
पुुणे रेल्वे स्थानकावरील वाढता ताण कमी करण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकाजवळील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांना थांबे देण्याचे नियोजन रेल्वेच्या पुणे विभागाकडून करण्यात येत आहे.
या संदर्भातील प्रस्ताव पुणे विभागाने रेल्वे मुख्यालयाला दिला आहे. त्यामुळे पुण्यातून धावणार्या एक्स्प्रेस गाड्यांना पुणे स्टेशनजवळच्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर लवकरच थांबे दिले जाणार आहेत.
त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होण्याबरोबरच प्रवाशांची संबंधित भागात उतरण्यासाठी सोय होणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. या निर्णयाला मान्यता आल्यास त्याची तत्काळ अंमलबाजवणी केली जाणार आहे. याकरिता वाढविण्यात येणारे २ प्लॅटफॉर्म रेल्वेसाठी फायद्याचे ठरणार आहेत.
हडपसर, खडकी टर्मिनल
मुंबईप्रमाणेच पुणे शहर परिसरातील स्थानके टर्मिनल म्हणून विकसित करण्यावर भर देत आहे. यानुसार रेल्वेकडून पुणे रेल्वे स्थानक परिसरातील हडपसर आणि खडकी स्थानकाचा टर्मिनल म्हणून विकास करण्याचे काम सुरू आहे.
ही स्थानके आगामी काळात पूर्णपणे विकसित झाल्यास पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होणार आहे. त्या दृष्टीने रेल्वेच्या पुणे विभागाकडून कामे केली जात आहेत.
त्याचाच भाग म्हणून खडकी टर्मिनलवर दोन प्लॅटफॉर्म वाढवले जाणार आहेत. त्यामुळे येथील प्लॅटफॉर्मची संख्या आगामी काही दिवसांत तीन अशी असणार आहेत. त्यासाठी पुणे विभाग ३५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
रेल्वे बोर्डानेही या कामाला मान्यता दिली आहे. त्यानुसार येथील एका प्लॅटफॉर्मची लांबी वाढणार, तर एक नवीन प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहे.





