पुणे जिल्हा | खडकवासलाचे दुसरे आवर्तन इंदापूरला नाही?

पळसदेव, (वार्ताहर) – इंदापूर तालुक्यातील खडकवासला लाभक्षेत्रातील नागरिकांचे कालव्याच्या दुसर्या आवर्तनाकडे लक्ष लागले आहे. सध्या तालुक्यात टंचाईची स्थिती निर्माण झाली असून जनावरांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या गावांच्या पाणी योजना खडकवासला कालव्याच्या जीवावर अवलंबून आहेत, त्या पाणी योजना बंद पडल्या असून त्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र टँकर भरण्याचे स्त्रोत मिळविणेही कठीण होत असल्याने तालुक्याला खडकवासला कालव्याचे आवर्तन देणे गरजेचे बनले आहे.
कालवा सल्लागार समितीच्या 24 फेब्रुवारी रोजीच्या बैठकीत धरणातील उपयुक्त पाणीसाठा विचारात घेवून इंदापूरला पिण्यासाठी व सिंचनासाठी दोन आवर्तने दिली जाणार असल्याचा निर्णय झाल्याचे तालुक्यातील पुढार्यांनी उर बडवून जाहीर केले. यासाठी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांमध्ये समाजमाध्यमांवर श्रेयवाद पेटला.
मार्चमध्ये तालुक्याला खडकवासला कालव्याचे आवर्तन देण्यात आले. मात्र पाणी प्रवाहाला जोर नसल्याने पाणी पोहोचते तोपर्यंत बंद पडत होते. अखेर पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी गस्त घालून अनधिकृत उपसा रोखत पाणी टेलला पोचविण्याचे प्रयत्न केले.
तालुक्यात सध्या 28 गावे व 282 वाड्या-वस्त्यांवर 54 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यापैकी बहुतांश गावे व वाड्यावस्त्या खडकवासला कालव्याच्या लाभक्षेत्रातील आहेत. यामुळे सध्या कालव्याच्या पाण्याची अत्यंत आवश्यकता असून, पिण्यासाठी व जनावरांसाठी लागणारे पाणी मिळविण्यात अडचणी येत आहेत.
एकीकडे उष्णता वाढली असून दुसरीकडे विहिरींनी तळ गाठला आहे. शेतातील पिके जळून गेली असून, त्याचा जनावरांच्या चार्यासाठीही उपयोग होणार नाही अशी अवस्था झाली आहे. कालव्याच्या पाण्याचा मोठा आधार असलेल्या गावांमध्ये टंचाईची स्थिती बिकट होत आहे. यामुळे कालव्याच्या आवर्तनाची गरज असून ते तात्काळ सुरू करण्याची मागणी कालवा लाभक्षेत्रातील नागरिकांतून होत आहे.
दौंडसाठी राखीव, मग इंदापूरला का नाही?
सध्या धरणातील उपलब्ध 5 टीएमसी पाणीसाठ्यापैकी पुण्याची तहान भागविण्यासाठी 3.5 टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. तर दौंडसाठी 1 टीएमसी पाणी व पालखीसाठी अर्धा टीएमसी पाण्याची तरतूद करण्यात आली आहे.
इंदापूरकरांच्या मात्र तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. दौंडसाठी पाणी राखीव ठेवता येते तर मग इंदापूरकरांसाठी का नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. इंदापूर तालुक्यात काय माणसं राहात नाहीत काय अशा संतप्त प्रतिक्रीया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
ताई, दादा, मामा, भाऊंची उदासिनता
इंदापूर तालुक्यात पश्चिमेकडून पुर्वेकडे वाहणारे नीरा डावा कालवा व खडकवासला कालवा असे दोन कालवे आहेत. सध्या ऐन उन्हाळ्यात नीरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू असून, यासाठी ताई, दादा, मामा, भाऊ या सर्वच नेत्यांनी प्रयत्न केल्याचे फलक समाजमाध्यमांवर झळकले आहेत.
मग या नेत्यांची खडकवासलाच्या आवर्तनासाठी उदासिनता का आहे. केवळ नीरा डावा कालव्याचा यांना थेट लाभ होत असल्याने, खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी प्रयत्न करण्यास यांच्याकडे वेळ नाही काय असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
यंदा केवळ तीन आवर्तने
गतवर्षी उन्हाळ्यात इंदापूरला खडकवासला कालव्याची दोन आवर्तने देण्यात आली होती. यंदा मात्र वर्षभरात तीन आवर्तने देण्यात आली आहेत. यामध्ये खरीप, रब्बी व उन्हाळी प्रत्येकी एक प्रमाणे अशी तीन आवर्तने देण्यात आली आहेत. वास्तविक खरीप हंगामात दोन, रब्बीमध्ये दोन व उन्हाळ्यात दोन आवर्तने मिळणे अपेक्षित आहे. मात्र टेलवर असलेल्या इंदापूरकरांना कालव्याच्या पाण्यापासून कायम वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
लोकसभेपुरते पाण्याचे गाजर
लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून इंदापूरला उन्हाळ्यात दोन आवर्तने देणार असल्याची घोषणा लोकप्रतिनीधींनी केली. मात्र मतदानानंतर आता तालुक्यात कालव्याचे पाणी येणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दौंडला पाणी मिळते, मग इंदापूरला पाणी देण्यात काय अडचण आहे.
तालुक्यातील खडकवासला कालव्याच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यात तालुक्यातील नेत्यांना रस नसल्याचे यातून दिसून येत आहे. केवळ जनतेची दिशाभूल करायची व मते मागायची एवढाच यांचा धंदा आहे. परंतू जनतेने यापुढे पाणी प्रश्न सोडविण्याचे वचन घेतल्याशिवाय मतदान न करण्याचा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत प्रकल्पग्रस्त शेतकरी विजय गावडे यांनी व्यक्त केले.
इंदापूरला पाणी देणे शक्य नाही
सध्या खडकवासला कालव्याचे आवर्तन सुरु करण्यात आले असून दौंडला पिण्याच्या पाण्यासाठी 1 टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. पालखीसाठी अर्धा टिएमसी व पुण्याच्या मे व जूनमधील पाण्याच्या गरजेसाठी साडेतीन टिएमसी पाणी राखीव ठेवले आहे.
धरणात सध्या पाच टिएमसी पाणी असल्याने या पाण्याचे नियोजन झाले आहे. यामुळे इंदापूरला सध्या दुसरे आवर्तन देणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण कार्यकारी अभियंता श्वेता कुर्हाडे यांनी दिले.





