पुणे | “खडकवासला-फुरसुंगी बंद पाइपलाइन’ मार्गी लागणार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे शहराला अतिरिक्त पाणी पुरवठा उपलब्ध करून देणारा आणि शेतीलाही पुरेशा पाणी देता येणे शक्य होणाऱ्या खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याच्या प्रकल्पाचा प्रस्ताव मागील काही महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाचा निम्मा खर्च महापालिका, उर्वरित राज्य सरकार निधी देऊन हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान २८ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पाणी येण्याची योजना जलसंपदा विभागाकडून तयार करण्यात आली आहे. जलसंपदा विभागानेच या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला. या अहवालास जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आणि त्यांनतर राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने (स्टेट लेव्हल टेक्निकल अॅडव्हायजरी कमिटी ) मान्यता दिली आहे.
या प्रकल्पासाठी एशियन डेव्हलपमेंट्स बँकेने कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे.त्यानुसार जलसंपदा विभागाकडून दोन हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून बँकेला सादर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे जलसंपदा विभागाने कालवा बंद करून जी जागा रिकामी होणार आहे. ती जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी, आणि त्या मोबदल्यात टीडीआर द्यावा, असा प्रस्ताव महापालिकेकडे सादर केला. त्यामुळे सर्व प्रकाराच्या मान्यता मिळाल्यानंतर अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे आहे.
पुणे मनपाचीही तयारी
या बंद कालव्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही रक्कम पाहता त्यामुळे हा प्रकल्प झाल्यानंतर कालव्याची जागा पुणे महापालिकेकडे वर्ग करावी. त्यापोटी महापालिकेने हस्तांतरण विकास हक्क (टीडीआर) किंवा रोख रक्कम द्यावी, अशी मागणी पुढे आली. त्याकरिता महापालिकेने तयारी दर्शविली आहे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी नुकतेच कालवा समितीच्या बैठकीत स्पष्ट केले.
काय आहे प्रकल्प
७.८० मीटर रुंद, ३.९० मीटर उंच आणि १.९५० मीटर गोलाकार उंची अशा “डी’ आकाराच्या बोगद्यातून खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याचे जलसंपदा विभागाकडून निश्चित करण्यात आले आहे. सुमारे २८ किलोमीटर लांबीचा हा बोगदा असणार आहे.
या बोगद्यामुळे कालव्याची क्षमता १५१० क्युसेक होणार असून ते सर्व पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीचा उपयोग करून फुरसुंगीपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण, गळती आणि बाष्पीभवन रोखण्यास मदत होऊन अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे.





