Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट ! 5,053 पानांचे दोषारोपपत्र दाखल
केतन अग्रवालच्या हत्येचा कट रचून त्याला लोहगडावर (Ketan Agrawal Case) नेण्यासाठी आरोपींनी ‘माही’ या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले होते.

Ketan Agrawal Case : केतन अग्रवालच्या हत्येचा कट रचून त्याला लोहगडावर (Ketan Agrawal Case) नेण्यासाठी आरोपींनी ‘माही’ या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले होते. या खात्यावरून केतनशी चॅटिंग करून सियाची मैत्रीण असल्याचे भासविण्यात आले. सियाचा वाढदिवस ‘सरप्राइज’ पद्धतीने साजरा करण्याच्या बहाण्याने केतनला लोहगडावर बोलावून दरीत ढकलून त्याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी (Ketan Agrawal Case) पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी वडगाव मावळ न्यायालयात ५ हजार ५३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. सिया प्रविण गोयल, चेतन बाबुलाल चौधरी आणि रितेश संजय हंगे यांच्याविरुद्ध हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तपासात डिजिटल, सायबर, तांत्रिक आणि न्यायवैद्यक पुरावे संकलित करण्यात आले आहेत.
१४ जूनला केतन (Ketan Agrawal Case) लोहगडावर जाऊन आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी पुन्हा १८ जूनला गडावर जाण्यास विरोध केला होता. त्यामुळे आरोपींनी बनावट इन्स्टाग्राम खात्याचा वापर करून त्याला लोहगडावर नेण्याचा कट आखला. हत्येनंतर हे खाते तसेच आरोपींमधील चॅटिंग व कॉल रेकॉर्ड नष्ट करण्यात आले. मात्र, पोलिसांनी डिजिटल फॉरेन्सिकच्या मदतीने हा डेटा पुनर्प्राप्त केला.
दोषारोपपत्रात १०० हून अधिक साक्षीदारांचे जबाब, शवविच्छेदन व वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर, व्हॉट्सॲप व अन्य चॅटिंग, आरोपींच्या हालचालींचे विश्लेषण, घटनास्थळाची पुनर्रचना, गेट ॲनालिसिस आणि न्यायवैद्यक अहवालांचा समावेश आहे.
लोहगडावरील जुन्या घटनेचा अभ्यास
तपासात सिया आणि चेतन यांनी मार्च २०२५ मध्ये नव्या सांगवीतील २१ वर्षीय तरुणीचा लोहगडावरून पडून झालेला मृत्यू आणि त्यासंबंधीची माहिती इंटरनेटवर शोधल्याचे समोर आले. तसेच सोनम रघुवंशी हत्या प्रकरणासह खुनाच्या घटनांशी संबंधित माहिती व चित्रपटांचाही अभ्यास केल्याचे (Ketan Agrawal Case) दोषारोपपत्रात नमूद आहे.






