Kesari Veer: आकांक्षा शर्माने सांगितले ‘केसरी वीर’च्या सेटवरील अनुभव

Kesari Veer: दिल्लीची आकांक्षा शर्मा ‘केसरी वीर’ या चित्रपटातून मुख्य नायिका म्हणून पदार्पण करत आहे. सोमनाथ मंदिरावर परदेशी आक्रमकांनी केलेल्या हल्ल्यांची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात ती महत्त्वाची भूमिका साकारत आहे. अभिनेता सुनील शेट्टीला आपले गुरू मानणाऱ्या आकांक्षाने चित्रपटाच्या निर्मितीवेळी अनुभवलेल्या खास क्षणांबद्दल मनमोकळेपणे सांगितले.

“मला वाटतं, हा महादेवाचाच आशीर्वाद आहे की माझी पहिलीच फिल्म सोमनाथ मंदिराच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. सेटवर पहिल्या दिवसापासूनच सर्व सहकलाकारांनी माझी खूप काळजी घेतली. त्यामुळे मला खूप बरं वाटलं,” असं आकांक्षाने एका मुलाखतीत सांगितले.
चित्रपटात सुनील शेट्टी आकांक्षाच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. याबद्दल ती म्हणते, “मी कितीही घाबरलेली असले, तरी सुनील सरांसोबत शूटिंगच्या पहिल्या दिवशी मला वाटलं की मी त्यांना खूप वर्षांपासून ओळखते. आमच्या घरी त्यांचे चित्रपट खूप पाहिले गेले. त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे स्वप्नवत अनुभव होता.”

पहिल्या सीनच्या वेळी मी माझे संवादच विसरले! कारण, ज्या सुनील शेट्टींचे चित्रपट पाहत मी मोठी झाले, त्यांच्यासोबत अभिनय करणं माझ्या स्वप्नातही नव्हतं. पण, त्यांनी त्या दिवशी मला जे गुरुमंत्र दिले, ते माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत.
चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रदर्शनावेळी आकांक्षाच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ती सांगते, “ट्रेलर रिलीज झाल्यावर माझे वडील इतके खुश झाले की त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. ते कोणाला दिसू नयेत म्हणून ते बाजूला जाऊन डोळे पुसत होते. तेव्हा माझ्या भावाने चोरून त्यांचा व्हिडिओ काढला.”

‘केसरी वीर’ हा चित्रपट आकांक्षाच्या करिअरची शानदार सुरुवात ठरणार आहे, यात शंका नाही. तिच्या या प्रवासाला प्रेक्षकांचा नक्कीच पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा आहे. केसरी विर हा चित्रपट 23 मे रोजी प्रदर्शीत होणार आहे.


