Shikrapur : संवेदनशील म्हणून केंदूरवर नजर – चंदशेखर यादव
Shikrapur : केंदूर येथे विषारी दारुने सहा जणांचे मृत्यू झाल्याबाबत पोस्ट काही दिवसांपासून सोशल मिडियावर फिरत असून याबाबत ग्रामस्थांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची भेट घेतली.

शिक्रापूर : केंदूर (ता. शिरूर) येथे गेल्या सहा महिन्यात सहा जणांचा मृत्यू कारणांसह वस्तुस्थितीचा खुलासा ग्रामस्थांसमोर आम्ही केला असून हा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविला असून सोशल मिडीयावर प्रसारित झालेल्या काही व्हायरल वृत्तांच्या अनुषंगाने केंदूरमध्ये तात्काळ गावबैठक घेतली असून बेकायदा दारु विक्रीच्या बाबतीत केंदूर संवेदनशील असल्याने या पुढील काळात आपण कडक भूमिका घेत असल्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले आहे.
केंदूर येथे विषारी दारुने सहा जणांचे मृत्यू झाल्याबाबत पोस्ट काही दिवसांपासून सोशल मिडियावर फिरत असून याबाबत ग्रामस्थांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची भेट घेतली. गावातील बेकायदा दारुविक्रीबाबत तक्रारी केल्याने त्या अनुषंगाने चंद्रशेखर यादव यांनी गावात येत ग्रामस्थांची चर्चा करत गेल्या सहा महिन्यात ज्यांचे मृत्यू विषारी दारुने झाल्याचा दावा सोशल मिडीयामध्ये दाखवला गेला त्यांच्या मृत्यूची शवविच्छेदन अहवालानुसार माहिती ग्रामस्थांना सांगित सहाही जणाचे मृत्यू विषारी दारुने झाले नसल्याचे सांगितले.
तर गेल्या वर्षभरात केंदूरमध्ये दारुबंदी कायद्यानुसार सात वेळा कारवाई केली असून यात सुर्योदय हॉटेलवरही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. या शिवाय गावातील युवकांच्या भावना बेकायदा दारुबाबत तिव्र व संतापजनक असल्याने केंदूरबाबतीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे गावातील सर्व हॉटेल्सची माहिती दिल्याने तीन दिवसांपूर्वी सदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात येवून संपूर्ण माहिती घेवून कारवाईची ग्वाही दिल्याचे सांगितले, तर शिक्रापूर पोलिसांकडून यापुढे केंदूर संवेदनशील म्हणून गृहीत धरले असल्याने या पुढे गावातील कुठल्याही तक्रारीवरुन तात्काळ कारवाई करण्याची ग्वाही पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ग्रामस्थांना दिली आहे.
मृत्यूची कारणे आता झाली स्पष्ट
केंदूरमध्ये गेल्या सहा महिन्यात विषारी दारुमुळे सहा जणांचे मृत्यू झाल्याच्या पोस्ट सोशल मिडीयात व्हायरल होऊन ते सहाही जण आदीवासी ठाकर असल्याचे सांगण्यात आले. मृत्यू पावलेल्यांची नावे आणि त्यांच्या मृत्यूची कारणे तत्कालीन शवविच्छेदनानुसार पुढीलप्रमाणे असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले. लहू सुरेश खंडे (वय ३२, मृत्यू कारण – फिट व दातखिळी), दादाभाऊ यशवंत गावडे (वय ३४, पाण्यात बुडून मृत्यू ), पथू तुकाराम गावडे ( वय ४१, रक्त कमी असल्याने मृत्यू ), चंद्रकांत बाळू गावडे (वय ३३) व रोहिदास सुनील गावडे (वय ३१) दोघे गळफास घेऊन आत्महत्या), योगेश सुभाष जाधव (वय २४, मृत्यू – फिटच्या त्रासाने ) या प्रकारे सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
वाद मिटणे गरजेचे
केंदूरमध्ये वादाचे मूळ हे गावातील एका यात्रा कमेटीतील आर्थिक आरोप प्रत्यारोपांचे तसेच ट्रस्टबाबतचे असून या प्रकरणी दोन्ही गटांना एकत्र करुन आम्ही एकत्रित बैठक घेत दोघांमधील वाद हे दोन्ही बाजुंनी मिटविणे गरजेचे असल्याने या वादावर आम्ही पोलीस म्हणून लक्ष ठेवून असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.





