Arvind Kejriwal : केजरीवाल यांचा शीशमहल मोठ्या प्रमाणात चर्चेत; कॅगचा ऑडिट रिपोर्ट आला समोर

नवी दिल्ली : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तयारीत प्रत्येक पक्ष व्यस्त आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी बांधलेल्या सरकारी निवासस्थानाच्या नूतनीकरणाबाबत भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष प्रश्न उपस्थित करत आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी नेहमीच सरकारी निवासस्थानाला ‘शीशमहाल’ असे नाव दिले आहे. आता कॅगचा ऑडिट रिपोर्ट आला आहे. त्यामध्ये असे उघड झाले आहे की, त्या घराच्या नूतनीकरणासाठी प्रस्तावित खर्चापेक्षा तिप्पटीने अधिक रक्क्म लागली आहे.
एवढा नूतनीकरणाचा खर्च
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते. लेखापरीक्षण अहवालानुसार या नूतनीकरणासाठी सुरुवातीला 7.91 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले. परंतु नंतर 2020 मध्ये सुमारे 8.62 कोटी रुपयांचे बजेट देण्यात आले. पण 2022 मध्ये पूर्ण झाल्यावर त्याची एकूण किंमत 33.66 कोटी रुपये होती. कॅग जनरल गिरीश चंद्र मुर्मू यांच्या अहवालाचा हवाला देत ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाशी संलग्न कर्मचारी ब्लॉक आणि कॅम्प ऑफिसच्या बांधकामावर 3.86 कोटी रुपये खर्च झाल्याचेही लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. निवासस्थानातील स्वच्छताविषयक वस्तू, फर्निचर आणि व्यायामशाळेच्या उपकरणांची दुरुस्ती/देखभाल यासाठी रु. 1.87 कोटी खर्च झाल्याचेही लेखापरीक्षणातून समोर आले आहे.
आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात दिल्ली सरकारच्या निष्काळजीपणाबद्दल (प्राधान्य न दिल्याबद्दल) कॅगनेही तक्रार केली होती. पावत्यांसोबत पुरवठा अनेकदा व्हाउचर नसल्यामुळे, कंत्राटदारांनी पुरवठा केलेल्या साहित्याची वास्तविक किंमत आणि ते ज्या दराने खरेदी केले होते त्याची पडताळणी करता येत नाही. गेल्या महिन्यात दिल्ली दक्षता संचलनालयाकडे संबंधित कथित अनियमिततेच्या चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
केंद्रीय अन्वेषण विभागाची तपासणी
सीबीआयने सप्टेंबर 2023 मध्ये या प्रकरणी प्राथमिक एफआयआर नोंदवला होता. दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार विजेंद्र गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीनंतर 6 डिसेंबर 2024 रोजी दिल्लीचे एलजी व्हीके सक्सेना यांनी नव्या चौकशीचे आदेश दिले होते. निवासस्थानातील कामाशी संबंधित बेकायदेशीरतेच्या कथित भूमिकेसाठी तीन अभियंत्यांना निलंबित केले आहे.
ऑडिट रिपोर्टमध्ये काय आहे?
वस्तूंचा खर्च (सर्व आकडे लाखांत)
1. टीव्ही कन्सोल – 20,34,200
2. मिनी बार युनिट -4,80,052
3. एल आकाराचा सोफा – 6,40,604
4. ट्रेडमिल आणि जिम – 18,52,155
5. स्वयंपाकघरातील भांडी – 39,08,846
6. सिल्क कार्पेट -16,27,690
7. गोल डायनिंग टेबल 4,80,052
8. बेड – 3,99,499
9. फॉक्स लेदर कव्हर – 5,45,878
10. सजावटीच्या वस्तू – 2,39,223





