केजरीवाल यांची कामगिरी चमत्कारापेक्षा कमी नाही ; सुनीता केजरीवाल यांचे प्रशंसोद्गार

चंदिगढ : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून ईश्वर बहुधा बडे कार्य करवून घेऊ इच्छितो. मोठी कामगिरी करण्यासाठी त्यांचा जन्म झाला आहे. त्यांची आजवरची कामगिरी कुठल्या चमत्कारापेक्षा कमी नाही, असे प्रशंसोद्गार केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी शनिवारी काढले. हरियाणातील विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. ती निवडणूक ताकदीने लढवण्याच्या उद्देशातून केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपने जय्यत तयारी केली आहे. केजरीवाल मूळचे हरियाणाचे आहेत.
मात्र, ते सध्या तुरूंगात असल्याने आपला तेथील जनतेपर्यंत पोहचवण्याची धुरा सुनीता यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. त्यातून त्यांनी हरियाणात सभा घेत जनतेला साकडे घातले. तसेच, सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवली. केजरीवाल यांनी आतापर्यंत भरपूर कामे केली. सरकारी शाळा आणि रूग्णालयांच्या स्थितीमध्ये सुधारणा इतर कुठल्या पक्षाने केली आहे का? कुणी मोहल्ला क्लिनिक सुरू केलेत का? मोफत वीज दिली का? तशी कामे केवळ हरियाणाचे पुत्र केजरीवाल हेच करू शकतात. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यावर जळतात, असा आरोप त्यांनी केला.
केजरीवाल यांना बनावट प्रकरणात तुरूंगात टाकण्यात आले. हरियाणा तो अपमान सहन करून स्वस्थ बसणार का? विषय केजरीवाल यांचा नसून हरियाणाच्या सन्मानाचा आहे. पुढील तीन महिन्यांत विधानसभा निवडणूक होईल. त्या निवडणुकीत भाजपला एकही जागा मिळणार नाही याची निश्चिती करा, असे आवाहन सुनीता यांनी हरियाणातील जनतेला केले. त्या राज्यात भाजप आणि कॉंग्रेसकडे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात आहे. त्याशिवाय, काही प्रादेशिक पक्षांचीही ताकद आहे. अशात आपमुळे आगामी निवडणुकीला बहुरंगी लढतीचे स्वरूप मिळणार आहे.





