अरविंद केजरीवाल पंजाबमध्ये करणार विपश्यना
Updated On:

नवी दिल्ली –आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल त्यांच्या पक्षाची सत्ता असणाऱ्या पंजाबमध्ये १० दिवस मुक्काम ठोकणार आहेत. मात्र, त्यांचा तो दौरा राजकीय स्वरूपाचा नाही. पंजाबमध्ये ते विपश्यना करणार आहेत. होशियारपूरमधील विपश्यना सत्रात ते ५ ते १५ मार्च या कालावधीत सहभागी होतील. याआधी डिसेंबर २०२३ मध्ये त्यांनी संबंधित ठिकाणी विपश्यना केली होती.
सुमारे महिनाभरापूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्या निवडणुकीतील पराभवामुळे आपला दिल्लीची सत्ता गमवावी लागली. तेव्हापासून केजरीवाल यांचा सार्वजनिक ठिकाणी फारसा वावर आढळलेला नाही. आता विपश्यना सत्र पूर्ण झाल्यानंतर ते पंजाबमध्ये कुठल्या राजकीय कार्यक्रमात सहभागी होणार का ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.




