Hemant Soren : हेमंत सोरेन यांच्या शपथविधीला केजरीवाल राहणार उपस्थित

नवी दिल्ली : झामुमोचे नेते हेमंत सोरेन पुन्हा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारणार आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. सोरेन आणि त्यांच्या पत्नी कल्पना यांनी मंगळवारी दिल्लीत केजरीवाल यांची भेट घेतली. सोरेन यांनी शपथविधी सोहळ्याचे दिलेले निमंत्रण केजरीवाल यांनी स्वीकारले.
केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीवेळी त्यांच्या पत्नी सुनीता आणि मनीष सिसोदिया, संजय सिंह हे आपचे नेतेही उपस्थित होते. सोरेन यांना तुरूंगात जावे लागले. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवून विजय प्राप्त केला. त्या सर्व घडामोडी आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत, अशी भावना केजरीवाल यांनी त्या भेटीवेळी व्यक्त केली.
झारखंडमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत बाजी मारून झामुमो, कॉंग्रेस आणि राजदचा समावेश असणाऱ्या इंडिया आघाडीने झारखंडची सत्ता राखली. मुख्यमंत्री सोरेन यांचा चेहरा पुढे करूनच ती आघाडी निवडणुकीला सामोरी गेली. त्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री बनण्यास सज्ज झाले आहेत. त्यांचा शपथविधी सोहळा गुरूवारी आयोजित करण्यात आला आहे.




