“केजरीवालांनी राजीनामा देऊ नये”

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असताना आणि विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असताना केजरीवाल काय करणार याबाबत राजधानी दिल्लीत आणि देशात चर्चा सुरू असतानाच आज आम आदमी पार्टीच्या आमदारांनी केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली.
केजरीवालांनी पद सोडू नये आणि तुरूंगातूनच सरकार चालवावे अशी गळ या नेत्यांनी केजरीवाल यांना घातली आहे. आपचे आमदार म्हणाले की दिल्लीतील २ कोटी जनता केजरीवाल यांच्यासोबत उभी आहे आणि त्यांनी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देऊ नये. केजरीवाल यांच्या निवासस्थानी आज झालेल्या या बैठकीला आपच्या ६२ पैकी ५५ आमदारांनी हजेरी लावली.
सूत्रांनी सांगितले की केजरीवाल, मनिष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन हे तीन आमदार तुरूंगात असल्यामुळे बैठकीला उपस्थित नव्हते तर चार आमदार दिल्लीबाहेर असल्यामुळे हजर राहु शकले नाहीत.





