केजरीवाल चौकशीसाठी दुसऱ्यांदा गैरहजर ! ईडीला पाठवले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे दुसऱ्यांदा टाळले. त्याऐवजी त्यांनी ईडीला उत्तर पाठवले. त्यामधून त्यांनी राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या निर्देशावरून समन्स बजावण्यात आल्याचा आरोप केला.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना सर्वप्रथम २ नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलावले. मात्र, ईडीचे समन्स अवैध आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याची भूमिका घेत ते चौकशीला गैरहजर राहिले. त्यामुळे ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावून त्यांना गुरूवारी (२१ डिसेंबर) चौकशीसाठी बोलावले. मात्र, केजरीवाल बुधवारीच १० दिवसांच्या विपश्यनेसाठी पंजाबला रवाना झाले.
चौकशीसाठी हजर राहण्याचे टाळत त्यांनी ईडीला उत्तर पाठवले. साक्षीदार की संशयित आणि मुख्यमंत्री की आपचा प्रमुख म्हणून मला चौकशीसाठी बोलावण्यात आले ते ईडीच्या समन्समध्ये नमूद करण्यात आलेले नसल्याचे केजरीवाल यांनी उत्तरात नमूद केले.
जवळ येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळजनक बातम्या घडवण्याचा आमच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा उद्देश आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या निर्देशावरून मला समन्स बजावण्यात आले, असा आरोपही केजरीवाल यांनी केला.





