Keir Starmer : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर पुढील आठवड्यात येणार भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर पुढील आठवड्यात दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यापासून स्टार्मर यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे.
दिनांक ८ ते ९ ऑक्टोबर दरम्यान स्टार्मर यांचा भारत दौरा दोन्ही देशांच्या भविष्यकालीन भागीदारी निर्माण करण्याच्या समान दृष्टिकोनाच्या समर्थनार्थ एक मोलाची संधी असेल, असे परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी म्हटले आहे. स्टार्मर दिनांक ९ ऑक्टोबर रोजी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी विस्तृत चर्चा करतील. दोन्ही पंतप्रधान व्हिजन २०३५ च्या अनुषंगाने भारत-ब्रिटन व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या विविध पैलूंमधील प्रगतीचा आढावा घेतील.
हा कार्यक्रम भारत आणि ब्रिटनमधील आर्थिक भागीदारीच्या आधारे १० वर्षांचा उपक्रमांचा केंद्रित आणि कालबद्ध रोडमॅप आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. जुलैमध्ये मोदींच्या लंडन भेटीदरम्यान भारत आणि ब्रिटनने ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे. बाजारपेठेतील सहभाग वाढवणे, ब्रिटिश मद्य आणि कारसह इतर वस्तूंवरील शुल्क कमी करणे आणि २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याची तरतूद या व्यापार करारात आहे.





