अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर सज्ज ठेवा

विभागीय आयुक्तांच्या शासकी, खासगी रुग्णालयांना सूचना
पुणे – सध्या पुणे जिल्ह्यात करोनाबाबत परिस्थिती आटोक्यात आहे. मात्र, भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली, तर रुग्णांवरील उपचारासाठी सरकारी रुग्णालयांबरोबरच खाजगी रुग्णालयांनी अतिदक्षता विभाग आणि व्हेंटिलेटरची यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालय यांच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खाजगी रुग्णालयाकडे उपलब्ध सुविधांची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सहकार आयुक्त अनिल कवडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. सचिंद्र प्रताप सिंह, बै. जी. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, डॉ. अशोक नांदापूरकर, महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे उपस्थित होते.





