nagar | ध्येय डोळ्यासमोर ठेऊन उंच भरारी घेण्याचा प्रयत्न करा- बाळासाहेब पाटील

नेवासा, (प्रतिनिधी) – आपण अहोरात्र कष्ट करून परीक्षेत यश संपादन केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो उचित ध्येय डोळयासमोर ठेऊन उंच भरारी घेण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन सिद्धेश्वर इंग्लिश स्कूलच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले.
तालुक्यातील प्रवरासंगम येथील श्री.सिद्धेश्वर इंग्लिश स्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव पुस्तके व प्रशस्तीपत्र देऊन देऊन गौरव करण्यात आला. सिद्धेश्वर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात अध्यक्षस्थानी सरपंच अर्चना सुडके होत्या.
माजी सरपंच सुनीलराव बाकलीवाल, मुळा कारखाना संचालक बाळासाहेब पाटील,ग्रा मविकास अधिकारी सुभाष शेळके, भारतीय लहुजी सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शांतवन खंडागळे,अशोक पुंड उपस्थित होते. मुख्याध्यापक बी.आर.गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.
दहावीत विद्यालयात प्रथम आलेली विद्या अरुण कोरडे ९४ टक्के,अर्पिता नानासाहेब शेवाळे ९३.६० टक्के द्वितीय, संस्कृती दीपक जाधव ९३.२० टक्के तृतीय, भक्ती लक्ष्मण परजणे ९२.८० टक्के चतुर्थ, प्रतीक्षा राजेंद्र सुडके ९१.८० टक्के पाचवी यांना आमदार शंकरराव गडाख यांच्या वतीने पुस्तके व अभिनंदन पत्र देऊन तर विद्यालयाच्या वतीने तर शाल, श्रीफळ देऊन सरपंच अर्चना सुडके व बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते गौरविण्यात आले.





