Pimpri | सुनील तटकरे यांना सत्तेपासून दूर ठेवा – आ. थोरवे

खालापूर, – कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात मी काठावर पास झालो नसून मेरिटमध्ये आलो आहे. तसेच अपक्ष उमेदवार सुधाकर घारे हे खासदार सुनील तटकरे यांचेच असल्याचा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला. तांबाटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार आदिती तटकरे यांनी केलेल्या टीकेला महेंद्र थोरवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
राज्यात भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाची युती असल्याने महाराष्ट्रात युतीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुका लढल्या गेल्या. मात्र कर्जत विधानसभा मतदारसंघात खासदार सुनील तटकरे यांनी अपक्ष सुधाकर घारे यांना उभे करून मला पाडण्याचे षडयंत्र रचले. परंतु मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, मी कधीही सुनील तटकरे यांना घाबरलो नाही, अशी सडकुन टीका थोरवे यांनी केली. यावेळी त्यांनी महायुतीत गद्दारी करणाऱ्या सुनील तटकरे यांना सत्तेपासून दूर ठेवा, अशी मागणी केली.
रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आणि भाजपाचे तीन आमदार असल्याने महाडचे आमदार भरत गोगावले यांना कॅबिनेट मंत्री करून त्यांना रायगडचे पालकमंत्री करा. मात्र राष्ट्रवादीचे एक आमदार आदिती तटकरे या असून त्यांना पालकमंत्री करणे हे आम्हाला कदापी मान्य नाही, अशी मागणी आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी केली असल्याचेही थोरवे यांनी सांगितले.





