Narendra Modi : “कॉंग्रेसला 100 वर्षे सत्तेपासून दूर ठेवा…’; पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन

Narendra Modi –पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी मध्यप्रदेशात झंझावाती प्रचार करताना कॉंग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. देशाच्या प्रगतीला मागे नेण्यात आणि सुशासनाचे रूपांतर कुशासनात करण्यात कॉंग्रेस तज्ञ आहे. त्या पक्षाला किमान 100 वर्षे सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहन मोदींनी जनतेला केले.
मध्यप्रदेशात भाजपला अनुकूल वातावरण निर्मिती करण्याच्या उद्देशातून मोदींनी एकाच दिवशी तीन सभा घेतल्या. विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर तगडे आव्हान उभे करणाऱ्या कॉंग्रेसवर त्यांनी टीकेची झोड उठवली. कॉंग्रेसने भगवान श्रीरामांना काल्पनिक म्हटले. त्या पक्षाने जम्मू-काश्मीरशी संबंधित कलम 370 हटवण्याला विरोध दर्शवला.
पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपतींच्या निवडीला कॉंग्रेसने विरोध केला. भारतीय भाषांत वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षण देण्याविरोधात त्या पक्षाने भूमिका घेतली. कॉंग्रेससाठी केवळ स्वहित सर्वोच्च आहे. त्या पक्षाच्या आश्वासनांना भुलू नका, असे मोदी मतदारांना उद्देशून म्हणाले. कॉंग्रेसने भ्रष्टाचाराचे नवनवे रेकॉर्ड केले.
आता देशाविरोधात कारस्थाने रचणाऱ्या परकी घटकांशी त्या पक्षाने हातमिळवणी केली आहे, असा आरोप त्यांनी केला. कॉंग्रेसकडे विकासासाठी कुठला रोडमॅप नाही. त्याउलट, आश्वासनपूर्ती ही माझी गॅरंटी आहे, अशी पुस्तीही मोदींनी जोडली.





