“वारसदार म्हणून आनंद दिघेंना मीच अग्नी दिला” ; मुख्यमंत्र्यांना केदार दिघेंचं सडेतोड उत्तर

Kedar Dighe on Eknath Shinde । राज्यातील विधानसभा निवडणुकीतील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. कारण या जागेवर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केदार दिघे यांना तिकीट दिले आहे. एका वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे यांनी “मी केदार दिघे यांना आनंद दिघे यांच्यासोबत कधीही पाहिले नाही, असे म्हणत त्यांनी दिघेंवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर आता केदार दिघेदेखील आक्रमक झालेत. “आनंद दिघे यांच्या पार्थिवाला मीच वारसदार म्हणून अग्नी दिला आहे,” असे म्हणत त्यांनी शिंदेंना प्रत्युत्तर दिलंय.
फक्त आडनावाने काहीही फरक पडत नाही Kedar Dighe on Eknath Shinde ।
एकनाथ शिंदे यांना एका वृत्तवाहिनीच्या मुलाखती दरम्यान, त्यांच्या मतदासंघात अद्याप विरोधकांमधील कोणीही मोठ्या नेत्याने सभा घेतलेली नाही. मात्र या मतदारसंघात दिघे हे आडनाव असलेला उमेदवार तुमच्या विरोधात उभा आहे, याबाबत काय वाटतं, असं शिंदे यांना विचारण्यात आलं होतं. यावर बोलताना आनंद दिघे आणि केदार दिघे यांच्यात खूप सारं अंतर आहे. आनंद दिघे हे माझे गुरु आहेत. त्यांचाच आदर्श घेऊन मी राजकारणात पुढे चाललो आहे. मला केदार दिघे हे आनंद दिघे यांच्यासोबत कधीही दिसले नाहीत, असा दावा शिंदे यांनी केला होता. तसेच आडनावाने काहीही फरक पडत नाही, असा टोलादेखील शिंदे यांनी लगावला होता. त्यावरच आता केदार दिघे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिघे साहेबांच्या पवित्र पार्थिवाला मीच अग्नी दिला Kedar Dighe on Eknath Shinde ।
केदार दिघे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना “दिघे साहेबांच्या पवित्र पार्थिवाला मी वारसदार म्हणून अग्नी दिला आहे. मी माझ्या लहान वयात दिघे साहेबांसोबत वावरलेलो आहे. ते वय काय राजकारण करण्याचं नव्हतं, इतकं मुख्यमंत्री असणाऱ्या माणसाला कळू नये, “असा बोचरी टीका केदार दिघे यांनी केली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांना ज्यांना गुरु मानतात त्यांचाच पुतण्या शिंदे यांच्याविरोधात उभा आहे. म्हणूनच कोपरी पाचपाखाडी हा मतदारसंघ सध्या राज्यभरात चर्चेचा विषय आहे. या जागेवर विजयी कामगिरी करण्यासाठी केदार दिघे यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर दुसरीकडे शिंदे यांनीदेखी या जागेवरून माझाच विजय होईल,” असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात नेमका कोणाच्या पारड्यात विजय पडणार हे पाहणे गरजेचे आहे.





