कवठेमहंकाळ मतदारसंघ: मतदारांना दिवाळीचा फराळ अन् पाकिटात 3000 रुपये दिले; व्हिडिओ व्हायरल

सांगली : विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election 2024) प्रचाराला सुरुवात झाली आहे. उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. मतदारांना उमेदवारांकडून दिवाळीच्या फराळाचे वाटप केले जात आहे. तर सांगलीतील कवठेमहांकाळ मतदार संघात दिवाळी फराळसोबत पैशांचे वाटप होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळत एकच खळबळ उडाली आहे.
कवठेमहंकाळ मतदारसंघातील तासगाव शहरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदाराना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटतानाचा प्रकार घडल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार व माजी खासदार संजयकाका पाटील गटाने केला आहे. या घटनेमुळे मतदारसंघात मोठा गोंधळ उडाला असून आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रारीसाठी पाटील गटाचे समर्थक ठाण मांडून बसले आहेत.
उमेदवार रोहित आर. आर. पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप संजयकाका पाटील गटाकडून करण्यात येत आहे. प्रत्येकी तीन हजार रुपयांचे पाकीट व दिवाळी फराळ असे वाटपाचे काम सुरू असल्याचा संजय पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप असून मोठ्या संख्येने संजय काका गटाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनजवळ जमले आहेत.
या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ देखील काढला आहे. तासगाव शहरातील साठेनगर भागात ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे संजय काका पाटील यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया देताना रोहित पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
संजय काका पाटील म्हणाले, अतिशय़ निंदनीय प्रकार असून मला कार्यकर्त्यांकडून फोनद्वारे माहित मिळाली आहे. उद्या-परवा मी तुम्हाला याबाबत पुराव्यानिशी माहिती देईन, लाखो रुपयांचे आमिष दाखवून काहींना फोडण्याचा प्रयत्न झाला आहे.
दरम्यान, याबाबत माहिती मिळताच तासगाव शहरातील या घटनेची फ्लाईंग स्कॉडकडून संपूर्ण तपासणी सुरू करण्यात आली आहे. तपासणीनंतर फ्लाईंग स्कॉडकडून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. पैसे वाटत असलेल्या कार्यकर्त्यांना संजय काका पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला नेले आहे. त्यामुळे, मतदारसंघासह सांगली जिल्ह्यातही या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे पैसे वाटणाऱ्या एकाने आपण शरद पवार गटाचे उमेदवार असलेल्या रोहित पाटील यांच्यासाठी पैसे वाटत असल्याचे कबूल केल्याचाही दावा करत एक व्हिडिओ देखील संजयकाका पाटील गटाने सोशल मीडियातून सार्वजनिक केला आहे. यावर आता काय ऍक्शन घेतली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





