Shirur News : कवठे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
Shirur News : कवठे येमाई येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (१२ जुलै) रात्री घडली.

Shirur News : कवठे येमाई येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (१२ जुलै) रात्री घडली. अष्टविनायक महामार्गावरील घोडेवस्ती परिसरात ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. (Shirur News)
मिळालेल्या माहितीनुसार, घोडेवस्ती येथील विष्णू भाईक यांच्या शेताजवळ रस्ता ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बिबट्याला सुमारे ९० फूट फरफटत नेले गेले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. (Shirur News)
घटनेची माहिती मिळताच शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नितीन म्हात्रे, वन कर्मचारी नारायण राठोड आणि वनमजूर हनुमंत कारकुड घटनास्थळी दाखल झाले. रेस्क्यू टीमच्या मदतीने मृत बिबट्याला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शिरूर येथे हलविण्यात आले. (Shirur News)
वन विभागाच्या माहितीनुसार, मृत बिबट्या अंदाजे चार वर्षांचा नर असून त्याचे शवविच्छेदन करून पुढील तपास करण्यात येणार आहे. दरम्यान, कवठे येमाई आणि परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने वन विभागाने अधिक पिंजरे लावावेत, तसेच वन्यजीव आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. (Shirur News)





