Kathua Encounter: सुरक्षा दलांना मोठे यश, जैश-ए-मोहम्मदचा पाकिस्तानी दहशतवादी ठार
किश्तवाडमध्येही शोध मोहीम सुरू असून जवानांनी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत.

Kathua Encounter: जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
मारला गेलेला दहशतवादी ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. बिलावर परिसरात सुरू असलेल्या या शोध मोहिमेमुळे सीमेवरील तणाव वाढला असून सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.
संयुक्त मोहिमेला यश
मिळालेल्या माहितीनुसार, कठुआच्या बिलावर भागात दहशतवादी लपल्याची पक्की बातमी सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय सैन्य आणि सीआरपीएफ (CRPF) यांनी संयुक्त शोध मोहीम राबवली.
या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, ज्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. गेल्या १० दिवसांपासून या परिसरात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात होते, त्यानंतर आज ही मोठी कारवाई करण्यात आली.
One terrorist killed in an encounter in Billawar area of Kathua: J&K Police
— ANI (@ANI) January 23, 2026
दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त
सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार, १० दिवसांपूर्वी राबवलेल्या एका मोहिमेत बिलावर भागात दहशतवाद्यांच्या तीन छुप्या तळांचा पर्दाफाश करण्यात आला होता. आजच्या चकमकीनंतर या परिसरातील दहशतवाद्यांचा तळ पूर्णपणे नष्ट करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून खाद्यपदार्थ, ब्लँकेट आणि भांडी यांसारखे हिवाळ्यातील साहित्य जप्त करण्यात आले असून, दहशतवादी या भागात दीर्घकाळ मुक्काम करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले.
किश्तवाडमध्ये शोध मोहीम सुरूच
दुसरीकडे, किश्तवाड जिल्ह्यातील डोंगराळ भागात सलग तिसऱ्या दिवशी मोठी शोध मोहीम सुरू आहे. रविवारपासून चतरू परिसरातील सोनार गावात सुरू असलेल्या या मोहिमेत सुरक्षा दलांचा दहशतवाद्यांशी सामना झाला.
या चकमकीत एका पॅराट्रूपरला वीरमरण आले असून सात जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर उपचार सुरू असून वरिष्ठ अधिकारी स्वतः या भागातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
सध्या कठुआ आणि किश्तवाड या दोन्ही जिल्ह्यांत अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली असून, जंगलात लपलेल्या इतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि आधुनिक उपकरणांची मदत घेतली जात आहे.





