पुणे | उमेदवारांच्या होम पिचवर काटे की टक्कर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात चुरशीच्या झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे.
कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कसबा मतदारसंघात सर्वाधित ५६ टक्के, तर मुरलीधर मोहोळ यांचे “होमपिच’ असणाऱ्या आणि मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणाऱ्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात ५४ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांमध्ये होमपिचवर “काटे की टक्कर’ असणार आहे.
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कसबा मतदारसंघात ५५ टक्के मतदान झाले होते. मात्र, त्यावेळी भाजपचे उमेदवार स्व. गिरीश बापट यांना कसब्यातून मताधिक्य मिळाले होते. मात्र, मागील वर्षी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या तत्कालीन आमदार स्व. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कसबा मतदारसंघाने रवींद्र धंगेकर यांच्या बाजूने कौल दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत कसब्याचा कौल कुणाला मिळणार? याबाबत उत्सूकता निर्माण झाली आहे.
पर्वती- कॅन्टोन्मेंट ठरविणार विजयाचे गणित
या वेळी पुण्यातील मतदानात पर्वती आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ उमेदवाराच्या विजयाचे गणित निश्चित करणार आहेत. या दोन्ही मतदारसंघात ५१ टक्क्यांच्या आसपास मतदान झाल्याने कसबा आणि कोथरूड बरोबरीत सुटले, तरी पर्वती आणि कॅन्टोन्मेंट विजयाची समीकरणे बदलणार आहे. २०१४ आणि २०१९ च्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपला मताधिक्य होते.
मागील निवडणुकीतही या दोन्ही मतदारसंघात तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक मतदान झालेले होते. मात्र, त्याच वेळी या दोन्ही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वस्ती भाग आहे. त्या ठिकाणी काॅंग्रेसचा पारंपरिक मतदारही आहे. त्यामुळे मतपेटीत या दोन्ही मतदारसंघांतील मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे.
वडगावशेरी, शिवाजीनगरमध्ये उदासिनता कायम
२०१९ ची तुलनात्मक आकडेवारी पाहता, या निवडणुकीतही शिवाजीनगर आणि वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात सर्वांत कमी मतदान झाले आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार शिवाजीनगर मतदारसंघात ४२ टक्के, तर वडगाव शेरी मतदारसंघात ४५ टक्के मतदान झाले आहे. २०१९ मध्ये शिवाजीनगर आणि वडगावशेरीत ४६ टक्के मतदान झाले होते.
तर या निवडणुकीत सर्वाधिक मतदान वडगावशेरी मतदारसंघात होते. तर शिवाजीनगरमध्ये भाजपचा आमदार असून, वडगावशेरीत महायुतीतील राष्ट्रवादी काॅंग्रेसचा आमदार आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात भाजपला चांगल्या मतदानाची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात कमी मतदान झाले आहे.





