काश पटेल यांचा मस्क यांच्या ‘त्या’ निर्णयाला विरोध? ट्रम्प यांच्या विश्वासू व्यक्तींमध्ये मतभेदाचे कारण काय? वाचा

Kash Patel | फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या (FBI) प्रमुखपदी काश पटेल यांची नियुक्ती झाली आहे. मात्र, जबाबदारी सांभाळल्यानंतर आता अब्जाधीश इलॉन मस्क यांच्याशी काही निर्णयांवरून त्यांचे मतभेद असल्याचे दिसत आहे. सध्या मस्क यांच्याकडे डिपार्टमेंट ऑफ गर्व्हमेंट इफिशियन्सी (DOGE) विभागाची जबाबदारी आहे. या विभागाने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवत त्यांच्याकडे कामाचा तपशील मागितला आहे. मात्र, काश पटेल यांनी FBI कर्मचाऱ्यांना मस्क यांच्या ई-मेलला ‘सध्या’ उत्तर देऊ नका, असे स्पष्ट सांगितले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मस्क यांच्याकडे DOGE च्या माध्यमातून सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे काम सोपवले आहे. त्यामुळे सरकारी खर्चात कपात, विविध विभागातील कामगार कपातीचे काम DOGE कडून केले जात आहे. त्यातच या विभागाने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवत कामाचा तपशील मागितला आहे. मात्र, काश पटेल यांनी एफबीआयच्या कर्मचाऱ्यांना या ईमेलला उत्तर न देण्यास सांगितले आहे.
रिपोर्टनुसार, पटेल यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की, ‘FBI कर्मचाऱ्यांना OPM कडून एक मेल आला असण्याची शक्यता आहे. या ईमेलमध्ये माहिती मागण्यात आली आहे. एफबीआयच्या सर्व पुनरावलोकन प्रक्रियांचे काम संचालक कार्यालयाच्या माध्यमातून केले जाते. FBI प्रक्रियांच्या अंतर्गत याची समीक्षा करू. जेव्हा पुढे अधिक माहितीची आवश्यकता असेल, तेव्हा आम्ही संपर्क साधू. सध्यातरी कोणतेही उत्तर देऊ नये.’
दरम्यान, मस्क यांच्या अंतर्गत येणाऱ्या DOGE कडून अनेक महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. अमेरिकेतील हजारो केंद्रीय कर्मचाऱ्यांना या विभागाकडून मागील आठवडाभरात केलेल्या कामाची माहिती देण्यासंदर्भातील ईमेल आला आहे. याबाबत मस्क यांनी ट्विटरवर माहिती दिली. कर्मचाऱ्यांना त्वरित या ईमेलला उत्तर देण्यास सांगण्यात आले. असे न केल्यास हा एकप्रकारे राजीनामा असल्याचे ग्राह्य धरले जाणार आहे.





